सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यांत अवकाळीने शेतीपिकांसह नेटशेड, संत्रा पिकांचे प्रचंड नुकसान!
– तातडीने पंचनामे करून मदत द्या, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलनाचा भुसारी यांचा इशारा
सिंदखेडराजा/देऊळगावराजा (अनिल दराडे) – सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यांत सोमवारी रात्री सात वाजेच्या दरम्यान वादळी वार्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामध्ये या दोन्ही तालुक्यांतील शेतकर्यांच्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर अनेक ठिकाणी बीजोत्पादन करणार्या जाळींची प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये गहू, शाळू, हरभरा, ऊस, आंबा, फळबागा आणि नेटशेडच्या नुकसानीचा आकडा मोठा आहे. या नुकसानीची पाहणी करून शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते अतुल भुसारी यांनी केली आहे. याप्रश्नी त्यांनी ठिय्या आंदोलनाचादेखील इशारा दिला आहे.
अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीची युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे यांनी प्रत्यक्ष शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली व ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना ते म्हणाले की, प्रशासनाने शेतकर्याच्या नुकसानाची पाहणी करून अहवाल शासनाकडे सादर करावा, व शेतकर्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानाची भरपाई त्वरित द्यावी. देऊळगावराजा, सिंदखेडराजा तालुक्यात दि. २६ व २७ फेब्रुवारी मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे शेतकर्यांचे रब्बी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. गहू, शाळू, हरभरा, ऊस, आंबा, फळबागा आणि नेटशेड मोठे नुकसान झालेले आहे. आळंद, पिंपळगाव, किनी पवार, मेव्हणा राजा, गारगुंडी, सिंनगावं जहांगीर, पांगरी माळी, डोईफोडे वाडी, खल्ल्याळ गव्हाण, निमगांव व इतर भागात हे नुकसान मोठे आहे. तालुका प्रशासन व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून,शासनाकडे पाठवून नुकसान भरपाई त्वरीत द्यावी, अशी मागणीही मनोज कायंदे यांनी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते अतुल भुसारी यांनीही शेतबांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. शेतातील गहू, हरभरा, कांदा या रब्बी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्वारी व गहू तर पूर्णपणे आडवा झाल्याचे दिसून आला असून, विकण्यासाठी तयार झालेला संत्राही गळून पडलेला आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी भुसारी यांनी केली. राज्य सरकारने शेतकर्यांवर अन्याय न करता सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते, पण आजही बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्यांना योग्य ती मदत मिळाली नाही. यावेळी अधिकार्यांनी जर चुकीचे व निरंक अहवाल सादर केले आणि मदत नाही मिळाली तर प्रसंगी राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करेल, असा इशारा भुसारी यांनी दिला आहे. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांशी चर्चा करुन नुकसानीची माहिती घेतली. राष्ट्रीय समाज पक्ष शेतकर्यांच्या पाठिशी असून, शेतकर्यांनीसुध्दा नाउमेद न होता टोकाचे कोणतेही पाऊल न उचलण्याचे आवाहन भुसारी यांनी केले आहे.
—————-