बारामतीतील शासकीय कार्यक्रमाचे शरद पवार यांनाच निमंत्रण नाही; सरकारवर टीकेची झोड!
– मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांकडून जेवनाचे निमंत्रण, पवारांनी नैतिक दबाव वाढविला!
पुणे (जिल्हा प्रतिनिधी) – बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या ग्राऊंडवर आयोजित नमो महारोजगार मेळाव्याचे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण न देण्यावरून आज दिवसभर जोरदार रणकंदन माजले. त्यातच या कार्यक्रमाला एक बारामतीकर म्हणून आपण प्रेक्षकांच्या रांगेत बसू, असे पवारांच्या गटाकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलाच नैतिक दबाव निर्माण झाला. निमंत्रण न देण्याचा गोंधळ हा प्रशासकीय पातळीवरून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या कार्यक्रमाची नव्याने पत्रिका छापली जाणार असून, त्यात शरद पवार यांचे नाव छापले जावून त्यांना निमंत्रण दिले जाईल, असे अखेर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बारामतीतील नमो रोजगार महामेळाव्याचे राज्य शासनाच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी स्थानिक खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि वंदना चव्हाण यांनादेखील निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, या निमंत्रितांच्या यादीमधून राज्यसभेतील खासदार तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाच वगळण्यात आले आहे. मात्र, शरद पवार यांनी वेगळीच खेळी करत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अडचणीत आणले. पवार यांनी थेट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बारामतीमध्ये असलेल्या आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले व सरकारवर चांगलाच नैतिक दबाव निर्माण केला. या घटनेने दिवसभर चांगलेच रणकंदन माजून सरकारवर नामुष्कीची वेळ ओढावली. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांना जेवनाच्या निमंत्रणाचे स्वतः शरद पवार यांच्यावतीने अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे. बारामतीमध्ये कोणताही कार्यक्रम असल्यास शरद पवार हे आलेल्या पाहुण्यांना आपल्या घरी आवर्जून जेवणासाठी बोलवतात. त्याचप्रमाणे यावेळी त्यांनी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांना जेवणाचे निमंत्रण दिले आहे. मात्र, आता हे नेते शरद पवार यांचे निमंत्रण स्वीकारतील का? हे पाहावे लागेल.
दरम्यान, निमंत्रण पत्रिकेत शरद पवार यांचे नाव का नाही, यामागील प्रशासकीय गोंधळाचे कारण स्पष्ट झाले आहे. हा शासकीय कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आले, परंतु शरद पवारच का वगळले, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना, प्रशासकीय अधिकार्यांनी सांगितले, की ‘स्वतः शरद पवार यांनी राजशिष्टाचार विभागाला कोणत्याही शासकीय कार्यक्रमात माझे नाव टाकू नये, अशा स्पष्ट सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शासकीय कार्यक्रमावेळी पवार यांचे नाव टाकण्यात येत नाही. त्यामुळे या कार्यक्रमातही नाव टाकण्यात आले नाही. मात्र आता पवार यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात येईल आणि नवी निमंत्रण पत्रिका तयार करण्यात येईल,’ असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. निमंत्रण पत्रिकेत नाव न टाकणे हा काही राजकारणाचा भाग नाही, असेही हा प्रशासकीय अधिकारी म्हणाला.
———-