आज मंत्रिमंडळ विस्तार शक्य; विदर्भातून संजय रायमुलकरांना लॉटरी?
अपडेट
आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार राज्य मंत्रिमंडळाचा प्रलंबित विस्तार आजच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे नियोजित सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांचे पुण्यातील कार्यक्रम रद्द केल्याचे वृत आले होते. त्यानतंर आजच भाजप आणि शिवसेनेचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या सर्व नियोजित बैठका पुढे ढकलल्या आहेत. आजच भाजप आणि शिवसेनेचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या विस्तारानंतर लवकरच खातेवाटप देखील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
– भाजप- शिंदे सेनेचे प्रत्येकी ५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता!
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्ताराला अखेर मुहूर्त लागण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. राजभवनात छोटेखानी शपथविधीची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत असून, या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे ५ व शिंदे सेनेचे ५ व काही अपक्ष असे आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, असे भाजपच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने खासगीत सांगितले. विदर्भातून मेहकरचे ज्येष्ठ आमदार डॉ. संजय रायमुलकर यांचे नाव हे वृत्तलिहिपर्यंत फायनल झाले होते. तथापि, रायमुलकर की संजय शिरसाठ असा पेच निर्माण झाला होता. हे दोन्हीही दलित नेते असून, यापैकी कुणालाही संधी मिळाली तरी दलित समाजाला सत्तेत वाटा मिळणार आहे. शपथविधीसाठी तयार राहण्याचा निरोप रायमुलकर यांना शिंदे सेनेच्या वरिष्ठांकडून देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. या शिवाय, अजितदादा पवारांच्या गटाच्या मंत्र्यांना खातेवाटपही उद्याच होईल, असेही सांगण्यात आले आहे.
काल रात्री उशिरापर्यंत वर्षा या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय बंगल्यावर शिंदे सेनेच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक पार पडली होती. तसेच, मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही रात्रीच बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार झाल्यशिवाय अजितदादा पवार गटाच्या मंत्र्यांना खातेवाटप करू नये, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली. त्यामुळे रात्रीच आज (दि.१२) मंत्रिमंडळ विस्ताराचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार, शिंदे गटातील ३ ते ४ मंत्र्यांची खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहेत. तर भाजपकडून ५ खाती राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार असल्याची माहिती या विश्वासनीय सूत्राने दिली. राष्ट्रवादी काँग्रेसला ९ खाती दिल्यानंतर उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, भाजप-शिंदे सेनेच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या दुपारी होणार असल्याची माहितीही या सूत्राने दिली. यामध्ये भाजपचे ५, शिवसेनेचे ५ आणि काही अपक्ष आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. काल रात्री 11 वाजता ही बैठक सुरू झाली. ती मध्यरात्री 1 वाजता संपली. तब्बल दोन तास ही बैठक चालली. या बैठकीत काही गोष्टींवर अंतिम हात फिरवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. अर्थखातं अजित पवार यांनाच देण्याचा निर्णय झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, अजितदादा पवार गटाला अर्थ, गृह, जलसंपदा ही खाती देण्यास शिंदे गट आणि भाजपकडून विरोध होत आहे. याऐवजी महसूल किंवा ऊर्जा खाते देण्याची तयारी शिंदे आणि भाजपने दर्शवली असल्याची माहितीही समोर आली असून, याच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, अनिल बाबर, योगेश कदम यांची नावे मंत्रिपदासाठी निश्चित झाली आहेत. चौथ्या नावासाठी मराठवाड्यातून संजय शिरसाठ किंवा विदर्भातून डॉ. संजय रायमुलकर यांच्यामध्ये चुरस होती. संजय शिरसाठ यांना मंत्रिपद दिल्यास शिंदे गटाकडून मराठवाड्याला तिसरे मंत्रिपद मिळेल. त्यामुळे विदर्भाला प्राधान्य देण्यासाठी संजय रायमूलकर यांना आता संधी देण्याचे निश्चित झाले असल्याचे हे वृत्त लिहिपर्यंत मुंबईतील चित्र होते. डॉ. रायमुलकर यांनाही तयार राहण्याची सूचना देण्यात आली असल्याचेही हे सूत्र म्हणाले.
विशेष म्हणजे, उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजितदादा गटाला स्थान मिळणार नसल्याची माहितीही देण्यात आली. अजितदादा गटाच्या मंत्र्यांना शिवसेना आणि भाजप मंत्र्यांकडची अधिकची खाती दिली जाणार आहेत, त्यामुळे भाजप आणि शिवसेनेची मंत्री संख्या कायम राहणार आहे, पण दोन्ही पक्षांच्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये खांदेपालट होणार आहे, त्यामुळे या संदर्भातील प्रशासकीय कारवाईलादेखील मुंबईत वेग आला होता. काही राजकीय पेच निर्माण झाला नाही तर उद्याचा छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार निश्चितपणे होणार असल्याची माहितीही राजकीय सूत्राने दिली आहे.