श्री गजानन महाराज संस्थानचे सेवाकार्य प्रशंसनीय : राज्यपाल कोश्यारी
विनाेद भाेकरे
शेगाव : बरेचदा श्री गजानन महाराज संस्थान शेगाव बाबत माहिती ऐकली होती. आज 7 जुलै रोजी प्रत्यक्ष शेगाव ला येण्याचा योग आला, श्री संस्थानमध्ये दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न झाले, समाधान वाटले. संस्थांनच्या सेवकार्याची माहिती जाणून घेतली. संस्थान करत असलेले लोकोपयोगी व सेवाभावी कार्य प्रशंसनीय असून, या संस्थानचा आदर्श इतर देवस्थानांनी घ्यावा, असे विचार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
राज्यपाल कोश्यारी व केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शेगावला येऊन श्री संत गजानन महाराजांचे गुरुवारी सायंकाळी दर्शन घेतले. श्री गजानन महाराज संस्थान तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. प्रशासनाकडून राज्यपालांना मंदिरचे प्रवेशद्वार समोर मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी प्रशासनाकडून जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी त्यांचे स्वागत केले. श्री गजानन महाराजांचे दर्शनास जातांना संस्थानच्या वतीने शाही थाटात मंगल वाद्याचे गजरात भव्य स्वागत तसेच ब्रह्मवृदांच्या मंत्रोपचारात औक्षण करण्यात आले. तदनंतर राज्यपाल व ना. गडकरी यांनी श्रीं चे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित भक्तांना त्यांनी हात उंच करून अभिवादन केले. अतिथी स्वागत कक्षात श्री संस्थानचे सेवाधारी व्यवस्थापकीय विश्वस्त निळकंठदादा पाटील यांनी त्यांचा श्रीं चा प्रसाद व शाल देऊन सत्कार केला. यावेळी राज्यपाल कोशारी व ना. नितीन गडकरी यांनी संस्थानच्या कार्याचा आढावा जाणून घेतला.
ना गडकरी यांनी श्री गजानन महाराज संस्थान सारखे पारदर्शी व स्वच्छ सुंदर कारभार असलेले दुसरे संस्थान संपुर्ण भारतात कुठेही नाही असे आवर्जून सांगत, जुन्या आठवणींना उजाळा दिला. ना नितीन गडकरी यांच्या पत्नी मुलगा व सून हे सुद्धा त्यांच्यासोबत होते. यावेळी श्री ग म संस्थानचे सेवाधारी विश्वस्त हरिहर पाटील, जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे, चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले, खामगावचे आमदार ऍड आकाश फुंडकर, विधान परिषदेचे आमदार वसंत खंडेलवाल, बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजयभाऊ गायकवाड यांचेसह भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड , शेगाव तहसीलदार समाधान सोनवणे, नायब तहसीलदार डॉ सागर भागवत, न प मुख्याधिकारी डॉ जयश्री काटकर, पोलीस अधिकारी तसेच न प तहसील व संबंधित यंत्रणांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.