मुस्लीम धर्मगुरु हत्याकांड; ‘आयबी’च्या रडारवरही होते येवल्याचे सुफीबाबा!
– येवला परिसरात कोट्यवधींची संपत्ती, विदेशातूनही देणग्या
नाशिक (ब्रेकिंग महाराष्ट्र) – अफगाणवंशाचे आणि भारतात गेल्या चार वर्षांपासून निर्वासिताचे शरणार्थी जीवन जगणारे ३५ वर्षीय मुस्लीम धर्मगुरु ख्वाजा सय्यद चिश्ती उर्फ सुफीबाबा उर्फ जरीफबाबा यांच्या मंगळवारी गोळ्या घालून झालेल्या हत्याकांडप्रकरणी येवला पोलिसांनी एकास अटक केली आहे. तर तिघांचा कसून शोध सुरु आहे. हे सुफीबाबा आयबी (गुप्तचर संस्था)च्या रडारवरदेखील होते. तसेच, त्यांनी येवला शहरात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बेनामी पद्धतीने गोळा केला असल्याचा संशयही तपास यंत्रणांना आहे. पोलिसांच्या तीन टीम मारेकर्यांचा शोध घेत आहेत.
सुफीबाबा उर्फ जरीफबाबा हे शाहरूख, सलमान आणि अमीर खान या तीनही खानांचे बनावट व्हिडिओ वापरून व हे खान त्यांचे भक्त आहेत, असे दर्शवून मुस्लीम तसेच हिंदू भाविकांना फसवत होते, अशी बाबही निदर्शनास आली आहे. याबाबतचे अनेक व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर टाकलेले आहेत. हे बाबा व त्यांचे कुटुंबीय गुप्तचर संस्था आयबीच्या रडारवरदेखील आले होते. वावी पोलिसांनी एक गोपनीय अहवाल २०२१ मध्ये आयबीला सोपवला होता. त्यानुसार, सुफीबाबा, त्यांची पत्नी व ड्रायव्हर यांच्यावर नजर ठेवली जात होती. कोट्यवधी रुपयांचे व्यवहार पोलिस व आयबीच्या रडारवर आले होते.
नाशिक पोलिसांच्या माहितीनुसार, सुफीबाबा उर्फ जरीफबाबा यांच्या हत्याकांडात त्यांच्या ड्रायव्हरचाही सहभाग असावा. ड्रायव्हर, बाबांचा सहाय्यक आणि अन्य दोघांनी मिळून हे हत्याकांड केले असावे, असा पोलिसांचा संशय आहे. मारेकरी हे या बाबांची एमएच ४३ बीयू ७८८६ ही चारचाकी गाडी घेऊन पळून गेलेले आहेत.
या सुफीबाबांना भारतात संपत्ती खरेदी करण्याचा अधिकार नव्हता. कारण, ते निर्वासित व शरणार्थी होते. त्यामुळे त्यांनी आपल्या जवळच्या लोकांच्या नावावर मालमत्ता खरेदी केली होती. त्यामुळे त्यांचे अनेकांशी शत्रुत्व निर्माण झाले होते. गेल्या चार वर्षांत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला होता. त्यापैकी चार कोटींच्या मालमत्तेची माहिती तपास यंत्रणांना मिळालेली आहे. काही दिवसांपूर्वीच या बाबांनी येवला येथे १५ एकर शेतजमीनदेखील खरेदी केली होती.
मीरगाव शिवारात सुफीबाबांचा आलिशान बंगला, विदेशी स्त्री
नाशिक जिल्ह्यातील वावी पोलिस ठाणे हद्दीअंतर्गत येणार्या मीरगाव शिवारात सुफीबाबाने एक आलिशान बंगला बांधलेला असून, तेथे ते एका विदेशी महिलेसोबत राहात होते. २८ वर्षीय तिरीना दाऊदी असे या महिलेचे नाव असून, ती अर्जेंटिनाची मूळरहिवासी आहे. या दोघांनी विवाह केला की नाही, याची माहिती उपलब्ध नाही. या महिलेला हिंदी, इंग्रजी किंवा मराठी भाषा येत नाही. त्यामुळे तिच्याकडून तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. या महिलेला नाशिक पोलिसांनी सुरक्षा पुरवलेली आहे.
ख्वाजा सय्यद चिश्ती हे येवला परिसरात सुफीबाबा नावाने ओळखले जात होते. येवला येथील एमआयडीसी परिसरात जेथे त्यांची हत्या झाली तेथे मंत्र-तंत्राची सामग्री आढळून आली आहे. हे बाबा जादूटोणा करत असल्याचा संशयदेखील आहे. आरोपींनी याच ठिकाणी त्यांना डोक्यात गोळ्या घालून ठार मारले होते.
————-