बुलढाणा (खास प्रतिनिधी) – शेतकऱ्याच्या मागील शुक्लकाष्ट काही संपत नाही. मोताळा तालुक्यातील तालखेड येथे अज्ञात चोरट्याने गोडाऊनचे शटर तोडून छतावरील ठिबक सिंचन साहित्य लंपास केले. तर अज्ञात आगलाव्याने गोडाऊनला आग लावल्याने अंदाजीत साडेपाच लाख रुपयांचा शेतमाल भस्मसात झाला आहे. याप्रकरणी ३ एप्रिल रोजी तक्रार दाखल करण्यात आली असून, मोताळा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
मोताळा तालुक्यातील तालखेड येथील शेतकरी कैलास शालिग्राम अत्तरकर यांच्या शेतामधील गोडाऊन मध्ये शेतमाल ठेवला होता. गोडाऊनच्या छतावर चार एकर शेतामधील ठिबक सिंचन साहित्य ठेवण्यात आले होते. अज्ञात चोरट्याने गोडाऊनचे शटर तोडून छतावरील ठिबक सिंचन साहित्य लंपास दरम्यान गोडाऊनला आग लावण्यात आली. यादीमध्ये गोडाऊन मध्ये ठेवलेला ५२ कापूस,५ क्विंटल हरभरा,४ क्विंटल गहू,४ क्विंटल ज्वारी व डीपी खतासह अंदाजीत साडेपाच लाखांचा शेतमाल खाक झाला. २ एप्रिलच्या पहाटे ६ वाजता ही घटना उघडकीस आली. शेतकरी अत्तरकर त्यांनी याबाबत मोताळा पोलीस स्टेशनला ३ एप्रिल रोजी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ४६१,३७९,४३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनात पो.कॉ. रामदास गायकवाड करीत आहेत.