– अवघ्या काही तासांवर आलेला पक्षप्रवेश रद्द: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम ऐनवेळी बारगळला!
– राहुल गांधींची थेट मध्यस्थी: व्हॉट्सअॅप कॉलवर झाली चर्चा; बोंद्रे भावूक होत म्हणाले, “आता सर्व काही गमावलं तरी तुमच्यासोबत लढत राहील.”
– भाजपच्या वरिष्ठ मंत्र्याला मोठा झटका: तयारी पूर्ण असतानाही सत्ताधाऱ्यांचा प्लॅन फिस्कटला!
बुलढाणा (बाळू वानखेडे): चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी अखेरच्या क्षणी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा आपला निर्णय बदलला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत आज होणारा त्यांचा पक्षप्रवेश अवघ्या काही तासांवर आला असतानाच, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट फोन करून त्यांची मनधरणी केली. राहुल गांधींच्या या एकाच फोन कॉलमुळे भाजपचा संपूर्ण प्लॅन ऐनवेळी फिस्कटला असून, राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसमध्येच कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. बोंद्रे यांना भाजपमध्ये आणण्यासाठी स्थानिक विरोध असतानाही एका वरिष्ठ मंत्र्याने प्रयत्न केले होते; हे मंत्रीदेखील आता तोंडघशी पडले आहेत.
राहुल बोंद्रे आज मुंबईत येऊन भाजपमध्ये प्रवेश करणार होते. त्यांच्या पक्षप्रवेशाला खरे तर विरोध असतानाही केवळ पक्षासाठी म्हणून स्थानिक आमदार श्वेताताई महाले यांनी जुळवून घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार, भाजपकडून सर्व तयारी आणि प्रोटोकॉल निश्चित करण्यात आला होता. परंतु, बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या कानावर टाकली. त्यानंतर त्यांनी राहुल गांधी यांनी बोंद्रे यांच्याशी व्हॉट्सअॅप कॉलवर संवाद साधला. “हार के बाद ही जीत है, तुमच्यावरचा दबाव आम्हाला ठाऊक आहे,” असा कानमंत्र देत त्यांनी बोंद्रे यांना धीर दिला. राहुल गांधींशी बोलताना बोंद्रे भावूक झाले आणि, “तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची दखल घेतली, आता सर्वकाही गमावलं तरी मी तुमच्यासोबत कायम लढत राहीन,” असा शब्द त्यांनी राहुल गांधींना दिला. बोंद्रे यांनी निर्णय बदलल्याची माहिती समजताच चिखली येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर मध्यरात्री शेकडो समर्थकांनी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली.
भाजपला मोठा धक्का आणि स्थानिक समीकरणे
विधानसभा निवडणुकीत चिखली मतदारसंघातून भाजपच्या श्वेताताई महाले यांनी राहुल बोंद्रे यांचा अत्यंत निसटता (३,७०२ मतांनी) पराभव केला होता. आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर मुख्य राजकीय प्रतिस्पर्ध्याला आपल्या गोटात ओढण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू होते. श्वेताताई महाले आणि त्यांच्या यंत्रणेने या पक्षप्रवेशासाठी पूर्ण तयारी केली होती; मात्र ऐनवेळी राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मध्यस्थीमुळे चिखलीच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या असून, भाजपच्या हातून मोठी शिकार निसटली आहे.
राहुल बोंद्रे यांना पक्षात आणण्यासाठी भाजपचे एक वरिष्ठ नेते व विद्यमान मंत्री प्रयत्न करत होते. त्यांच्याच माध्यमातून हा पक्षप्रवेश होणार होता; परंतु हे मंत्रीही आता चांगलेच तोंडघशी पडले आहेत. सध्या राहुल बोंद्रे यांचा मोबाईल ‘नॉट रिचेबल’ येत असून ते नेमके कुठे आहेत, याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. मात्र, या संपूर्ण घटनाक्रमाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.