– बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून मदतीची शेतकरी संघटनांची मागणी
– शेतकरी नेते देविदास कणखर, विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
– प्रत्यक्ष पाहणीनंतर पालकमंत्र्यांचे सकारात्मक आश्वासनाचे गाजर; निर्णयाकडे लक्ष
चिखली (अंकुश पाटील): पावसाचा दीर्घ खंड आणि खरीप पिकांच्या प्रचंड नुकसानामुळे हवालदिल झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. चिखली येथे सलग दोन दिवस चाललेल्या आंदोलनाची दखल घेत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, आगामी आठवडाभरात शासनाकडून ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.
जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि मका या प्रमुख खरीप पिकांवर पावसाच्या खंडाचा मोठा घाव बसला आहे. या बिकट परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटनेच्या वतीने चिखलीत अनोखे आंदोलन पुकारण्यात आले होते. ‘फक्त बैठका नको, पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर यावे’ अशी आक्रमक भूमिका घेत ‘काजू-बदाम घ्या, पण शेतकऱ्यांच्या बांधावर या’ असे म्हणत प्रशासनाला जाब विचारण्यात आला होता. या आंदोलनानंतर अखेर पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष शिवारफेरी करत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांना निवेदन दिले. त्यात, बुलढाणा जिल्ह्याचा तातडीने कोरडा दुष्काळग्रस्त जिल्ह्यात समावेश करावा, बाधित शेतकऱ्यांना कोणत्याही अटीविना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, पीकविमा आणि कर्जमाफीसंदर्भातील प्रश्न मार्गी लावावेत, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था प्रत्यक्ष पाहिल्यानंतर पालकमंत्र्यांनी यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, केवळ आश्वासनांवर न थांबता, “आठवडाभरात ठोस निर्णय न झाल्यास शेतकरी संघटना पुन्हा तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसेल,” असा इशारा देविदास कणखर व विनायक सरनाईक यांनी दिला आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी आमदार श्वेताताई महाले, आमदार मनोज कायंदे यांच्यासह नितीन राजपूत, गणेश थुट्टे, मुरलीधर येवले, गोपाल ढोरे, विनोद थुट्टे, औचितराव वाघमारे आणि गणेश गारोळे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. चिखलीसह लोणार आणि जिल्ह्यातील इतर भागांतही शेतकरी आता शासनाच्या भूमिकेकडे डोळे लावून बसले आहेत.