-१४ व १९ वर्षे मुलांच्या तसेच १९ वर्षे मुलींच्या संघांनी तालुकास्तरीय स्पर्धेत मारली बाजी; शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक
चिखली (राजेंद्र घुबे) : राज्य क्रीडा संचालनालयाच्या वतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या समन्वयाने तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. २२ सप्टेंबर रोजी चिखली येथील शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर तालुकास्तरीय मुला-मुलींचे हॉलीबॉल सामने पार पडले. यामध्ये देऊळगाव घुबे येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या १४ व १९ वर्षे वयोगटातील मुलांचे तसेच १९ वर्षे वयोगटातील मुलींचे असे तीन संघ तालुकास्तरावर विजयी ठरले.
नव्यानेच पुढे आलेल्या रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रासोबतच क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
१४ वर्षे मुलांच्या संघाचा दिमाखदार विजय
१४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने पहिल्या सामन्यात शिवाजी हायस्कूल, चिखली, त्यानंतर विद्या निकेतन, चिखली आणि उपांत्य सामन्यात चैतन्य गुरुकुलच्या संघाचा पराभव केला. त्यानंतर अंतिम सामन्यात आदर्श विद्यालयाच्या संघावर विजय मिळवत या संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. या संघात योगेश जावळे, गणेश पैठणे, रितेश घुबे, शिवराज येते, गणराज परिहार, आर्यन थुट्टे, आदित्य घुबे, समर्थ भागवत, वेदांत घोडकी आणि गौरव खेडकर या खेळाडूंनी सहभाग घेत एकसंघ खेळाचे प्रदर्शन करीत विजय संपादन केला.
१९ वर्षे मुलांच्या संघाचीही बाजी
१९ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाचा अंतिम सामना चैतन्य गुरुकुलच्या संघासोबत झाला. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या संघाने विजय मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश केला. या संघात सत्यम मिसाळ, कार्तिक शेळके, प्रथमेश चवरे, ओम घुबे, अभिषेक साखरे, सोहम घुबे, अतुल पेरे, सुमित खेडेकर, सुहास, मनोज घुबे, सुहास खेडेकर, हरीओम डोईफोडे आणि सुरज वायाळ या खेळाडूंनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
१९ वर्षे मुलींच्या संघाचा एकतर्फी विजय
१९ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाचाही अंतिम सामना चैतन्य गुरुकुलच्या संघासोबत झाला. या सामन्यात रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या मुलींनी एकतर्फी विजय संपादन करीत जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश केला. या संघात दिव्या काकडे, खुशी जाट, पुष्पांजली घुबे, विशाखा घुबे, मयुरी घुबे, गौरी घुबे, शिवकन्या घुबे, अक्षरा डोके, दिशा गोळे, श्वेता थुट्टे, आरती बोर्डे आणि सारिका जाधव या खेळाडूंनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे या संघाने यापूर्वी तीन वेळा राज्यस्तरीय स्पर्धेत पोहोचून बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. आता चौथ्यांदा हा संघ राज्यस्तरावर पोहोचतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रात झपाट्याने पुढे येत असलेल्या रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलने एकाच वेळी हॉलीबॉलचे तीन संघ तालुकास्तरावर विजयी करण्याचा मान मिळविला आहे. देऊळगाव घुबे या ग्रामीण भागातील शाळेच्या या कामगिरीचे चिखली परिसरात कौतुक होत आहे. भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेनफडराव घुबे यांचे शिस्तबद्ध प्रशासन, उच्च दर्जाचे क्रीडा शिक्षक तसेच विद्यार्थी आणि पालक यांच्यातील समन्वय हे या यशामागील महत्त्वाचे कारण असल्याचे परिसरात बोलले जात आहे. या यशाने हुरळून न जाता जिद्दीने आणि ताकदीने खेळून राज्यस्तर गाठण्यासाठी खेळाडूंनी जोमाने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून, पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. संस्थेच्या वतीने सचिव प्रा. उद्धव घुबे, प्राचार्य बबनराव लांडगे आणि माजी प्राचार्य हरिदास घुबे यांनी विजयी संघांचे तसेच त्यांचे क्रीडा मार्गदर्शक पंजाबराव गुंजकर आणि रामेश्वर कऱ्हाडे यांचे अभिनंदन केले आहे.