-आमदार राजेश बकाने यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; महसूल मंडळातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच मिळणार प्रशासकीय सेवा
वर्धा (प्रकाश कथले) : अल्लीपूर परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. महसूल व वन विभागाच्या २२ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार अल्लीपूर येथे अपर तहसीलदार कार्यालय कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अल्लीपूर, सीरसगाव आणि कानगाव महसूल मंडळांचा समावेश असणार आहे.
अल्लीपूर येथे अपर तहसीलदार कार्यालय सुरू व्हावे, यासाठी आमदार राजेश बकाने यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. यासंदर्भात मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांनी ही मागणी लावून धरली होती. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. या निर्णयामुळे अल्लीपूर परिसरातील नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी होणारी गैरसोय दूर होणार असून, स्थानिक पातळीवरच जलद, सुलभ आणि प्रभावी प्रशासकीय सेवा मिळणार आहेत. अल्लीपूर येथे अपर तहसीलदार कार्यालयाला मंजुरी दिल्याबद्दल आमदार राजेश बकाने आणि अल्लीपूरकर ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहेत.