-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न रस्ता रोको आंदोलन; पीक नुकसानभरपाई, १०० टक्के पीक विम्यासह एकरी ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या पावन भूमीत, मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस बुलढाणा जिल्ह्याच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर तीव्र अर्धनग्न रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सिंदखेडराजा आणि देऊळगावराजा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
बुलढाणा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके करपून गेली आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. असे असतानाही सरकार या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला असला, तरी ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवली. त्यानंतर सप्टेंबर महिनाही कोरडा गेल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. शेतात पीक दिसत असले, तरी सोयाबीनच्या शेंगांची अपेक्षित वाढ झालेली नाही. काढणीचा खर्च एकरी सुमारे चार हजार रुपये असून, तो खर्चही शेतकऱ्यांना परवडत नसल्याची परिस्थिती आंदोलकांनी मांडली. शासनाने दुष्काळग्रस्त तालुके जाहीर करताना सिंदखेडराजा आणि देऊळगावराजा तालुक्यांना वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यांसह संपूर्ण बुलढाणा जिल्हा तात्काळ कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, नुकसान झालेल्या पिकांची तात्काळ भरपाई द्यावी, १०० टक्के पीक विमा मंजूर करावा आणि शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. जोपर्यंत बळीराजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील, असा इशाराही आंदोलकांनी दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिनकरराव देशमुख, शिवाजी राजे देशमुख, सिंदखेडराजा मतदारसंघ प्रमुख जगन मामा सहाने, माजी सभापती विठ्ठल राठोड, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गंगाधर जाधव, मधुकर गव्हाड, आत्माराम कायंदे, आदित्य काटे, योगेश नाईक, सभापती उमेश शेजूळ, सय्यद रफीक यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काही काळ आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर तहसीलदार अजित दिवटे यांना निवेदन सादर करण्यात आले.