अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर यांचे आवाहन; जालन्यात २९ सप्टेंबरपर्यंत ‘कर्णबधिर आंतरराष्ट्रीय सप्ताह’!
जालना (जिल्हा प्रतिनिधी) : कर्णबधिर व्यक्तींना समाजात समान संधी, सन्मान आणि अधिकार मिळणे अत्यंत आवश्यक असून, श्रवणदोषाचे वेळीच निदान आणि योग्य उपचारांबाबत नागरिकांनी जागरूक राहायला हवे. विशेषतः बालकांमधील श्रवणदोषाचे वेळेवर निदान झाल्यास पुढील उपचार, पुनर्वसन आणि ‘स्पीच थेरपी’चा लाभ वेळेत घेता येतो. त्यामुळे कानाशी संबंधित कोणतीही अडचण जाणवल्यास अंगावर न काढता तपासणी करून घ्यावी आणि मोठ्या आवाजापासून कानांचे रक्षण करावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी केले.
राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंधक व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जालन्यात २१ ते २९ सप्टेंबर २०२६ दरम्यान ‘कर्णबधिर लोकांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह’ साजरा केला जात आहे. २६ सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिनाच्या पार्श्वभूमीवर या जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या सप्ताहात ‘कर्णबधिर व्यक्तींचे अधिकार’ हा विषय मध्यवर्ती ठेवण्यात आला आहे. सांकेतिक भाषा वापरणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या भाषिक व सामाजिक हक्कांची माहिती मिळावी; तसेच शिक्षण, रोजगार व संवादात समान संधी उपलब्ध व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. कर्णबधिरता ही केवळ वैद्यकीय समस्या नसून ती सामाजिक सहभागाशी निगडित असल्याने त्यांच्या हक्कांचा आदर करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे डॉ. गाडेकर यांनी स्पष्ट केले.
बालकांमधील श्रवणदोषाकडे दुर्लक्ष नको
बालकांमधील श्रवणक्षमतेची समस्या वेळीच ओळखून नवजात बालकांची OAE (Otoacoustic Emissions) किंवा BERA/AABR या आधुनिक चाचण्यांद्वारे तपासणी करणे गरजेचे आहे. वेळेत निदान झाल्यास योग्य श्रवणयंत्र आणि स्पीच थेरपीच्या माध्यमातून मुलांच्या संवादकौशल्याचा विकास घडवून आणता येतो. याशिवाय, सततच्या मोठ्या आवाजामुळे होणारा ‘नॉईज इंड्यूस्ड हिअरिंग लॉस’ (NIHL), कान दुखणे आणि चिडचिड यांसारखे त्रास टाळण्यासाठी कामाच्या ठिकाणी वा दैनंदिन जीवनात सुरक्षितता बाळगणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात सध्या विविध ठिकाणी मोफत श्रवण तपासणी शिबिरे आणि मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत डीन डॉ. सयदा अफ्रोझ, डॉ. गायत्री गाठेकर, डॉ. कीर्ती कऱ्हाडकर, डॉ. राजेंद्र अंभोरे, प्रियांका नितूरकर, सतीश खरसाण व रामेश्वर मोरे हे विशेष सहकार्य करत आहेत.