– येत्या दोन दिवसांत राज्यासाठी दुष्काळाचा जीआर; सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– देवेंद्र फडणवीसांसह संपूर्ण मंत्रिमंडळ शेतकऱ्यांच्या बांधावर; एकनाथ शिंदे विदर्भात!
लातूर / मुंबई (केयूर सांगळे) : राज्यात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिला आहे. “येत्या दोन दिवसांत दुष्काळाचा शासन निर्णय (जीआर) काढला जाईल. सर्व नियमांच्या पलीकडे जाऊन दुष्काळग्रस्त बळीराजाला सरसकट मदत केली जाईल,” अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान केली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण मंत्रिमंडळासह दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले असून, शेतीच्या नुकसानीची पाहणी करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विदर्भातील अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांत थेट शेतबांधावर पोहोचून शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी करत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी लातूर जिल्ह्यातील निलंगा, औसा आणि जाऊ या नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात पिकांची पाहणी केली. अपुऱ्या पावसामुळे सोयाबीनसह खरीप पिके करपून गेली असून, नदी-नाले आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. या गंभीर परिस्थितीची पाहणी करत मुख्यमंत्र्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
शेतकऱ्यांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “कायद्याच्या चौकटीनुसार आपल्याला पंचनामे करावे लागतात; मात्र पंचनामे झाले तरी मदत सरसकटच केली जाईल. हे सरकार शेतकऱ्यांचे असून, त्यांना पुन्हा पायावर उभे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. केवळ आर्थिक मदतच नाही, तर रब्बी हंगामासाठी पिकांचे नियोजन, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि अन्नधान्य पुरवण्याची पूर्ण व्यवस्था सरकार करणार आहे.”
या पाहणी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे यांच्यासह महसूल आणि कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाला तातडीने नुकसानीचे अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी संपूर्ण शासन यंत्रणा मैदानात उतरली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भातील अमरावती आणि अकोला जिल्ह्यांचा दौरा करून पिकांची स्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा आढावा घेतला. तर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी खामगाव तालुक्यातील दुष्काळी भागात थेट शेतात जाऊन पंचनामा केला.
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात पावसाची सरासरी १७ टक्के तूट नोंदवण्यात आली आहे. मराठवाड्यात ही तूट तब्बल ३७ टक्के, तर विदर्भात २७ टक्के आहे. तालुका आणि मंडळ (सर्कल) पातळीवर विचार केल्यास निम्म्यापेक्षा जास्त तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण ६० ते ७० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे खरीप हातचे गेले असून, रब्बी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.