सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील पीकहानी, वीज आणि पीक विम्याच्या प्रश्नांवर माजी आमदारांचा थेट पाठपुरावा
सिंदखेडराजा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि विजेअभावी वाळून गेलेल्या पिकांमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा जाधव पाटील यांची माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी भेट घेऊन प्रत्यक्ष वस्तुस्थिती मांडली. तसेच बाधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी करणारे निवेदन त्यांना सोपवले.
निवेदनाद्वारे मतदारसंघातील पीक नुकसानीची सविस्तर माहिती पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय उपलब्ध होती, परंतु महावितरणच्या अपुऱ्या आणि खंडित वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता आले नाही, अशाही शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त ग्राह्य धरून शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी आग्रही मागणी डॉ. खेडेकर यांनी केली.
क्षेत्रातील अनेक भागांत विद्युत डीपी (ट्रान्सफॉर्मर) वारंवार नादुरुस्त होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे शेतीचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी गरजेनुसार अतिरिक्त व नवीन डीपी तातडीने मंजूर करून उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यासोबतच पीक विम्याची थकीत रक्कम आणि शासनाकडून मिळणारी मदत विनाअट व तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची विनंती त्यांनी केली.
या प्रसंगी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिनकर खरात, तालुकाप्रमुख सुदाम काकड, युवासेना सिंदखेडराजा विधानसभा संपर्कप्रमुख दीपक पवार, सरपंच निवृत्ती कठोरे आणि सतीश राजमाने यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदारसंघातील शेतकरी अडचणीत असताना त्यांना प्रशासकीय व शासकीय पातळीवरून तातडीने दिलासा मिळवून देण्यासाठी आपला पाठपुरावा कायम राहील, असा विश्वास डॉ. खेडेकर यांनी व्यक्त केला.