सावरगाव माळ येथे शेतकऱ्यांशी संवाद; अचूक पंचनामे करून भरीव मदत देण्याची मकरंद पाटील यांची ग्वाही!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : पावसातील खंड, अनियमित पर्जन्यमान आणि त्यामुळे पिकांच्या वाढीवर झालेला गंभीर परिणाम यामुळे सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी तालुक्यातील सावरगाव माळ येथे थेट शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. तसेच बाधित शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पावसाच्या अभावामुळे पिकांची झालेली दुरवस्था, घटणारे अपेक्षित उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत पालकमंत्र्यांनी सविस्तर माहिती घेतली. यावेळी तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त क्षेत्राचे अचूक व वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. “प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीची योग्य नोंद घेऊन पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून द्यावा. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता महसूल व कृषी विभागाने घ्यावी,” अशा सूचना मकरंद पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
दौऱ्यादरम्यान पालकमंत्र्यांनी खडकपूर्णा धरणाला भेट देऊन सद्य पाणीपातळी, उपलब्ध जलसाठा आणि सिंचन नियोजनाचा आढावा घेतला. पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक आरक्षण सुरक्षित ठेवून उर्वरित पाण्याचा वापर सिंचनासाठी योग्य पद्धतीने आखण्याचे निर्देश त्यांनी दिले. उपलब्ध जलसाठ्याचा शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने ठोस आराखडा तयार करावा, असेही ते म्हणाले. प्रशासकीय आढाव्यानंतर शासनस्तरावर नुकसानभरपाईबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगत ‘शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून भरीव मदत केली जाईल,’ अशी ग्वाही त्यांनी दिली.
या पाहणी दौऱ्याच्या वेळी आमदार कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.