उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांचे आवाहन; दहिगाव-ने येथे पाच दिवसीय सेंद्रिय-नैसर्गिक शेती प्रशिक्षणाचा समारोप
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : ग्रामीण भागातील युवकांनी कृषी क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करताना शेतीकडे केवळ उत्पादनाचे साधन म्हणून न पाहता व्यावसायिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून पाहणे काळाची गरज आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून नैसर्गिक शेतीचे प्रयोग हाती घेतल्यास कमी खर्चात शाश्वत शेतीकडे वाटचाल करता येईल, असे प्रतिपादन ‘जिवंत सातबारा’ उपक्रमाचे जनक तथा अमरावतीचे उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव-ने यांच्या वतीने ग्रामीण युवक-युवतींसाठी आयोजित पाच दिवसीय सेंद्रिय व नैसर्गिक शेती कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील, आमदार चंद्रशेखर घुले पाटील व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनातून १६ ते २० सप्टेंबरदरम्यान या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षण वर्गात केवळ सैद्धांतिक माहिती न देता प्रत्यक्ष कृतीवर भर देण्यात आला. जमीन सुपीकता आणि नैसर्गिक शेतीतील अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत बहिरट पी. एस. यांनी मार्गदर्शन केले. विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) माणिक लाखे यांनी स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधनांतून नैसर्गिक शेतीसाठी लागणाऱ्या विविध निविष्ठा तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. यामुळे शेतीवरील उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केवळ पीक उत्पादनावर न थांबता शेतीमालाचे मूल्यवर्धन, आकर्षक पॅकिंग, ब्रँडिंग आणि थेट विक्री व्यवस्थापनावर तज्ज्ञांनी विशेष भर दिला. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या शेतीमालाची गुणवत्ता टिकवून त्याला योग्य बाजारपेठ कशी मिळवावी, याविषयी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. कौशिक एस. एस. यांनी सेंद्रिय उत्पादन प्रमाणीकरणाची (Organic Certification) प्रक्रिया आणि त्याचे बाजारपेठेतील महत्त्व विशद केले.
प्रशिक्षणार्थींनी भगूर येथील सौ. कल्याणी मुर्दारे यांच्या नैसर्गिक शेती प्रक्षेत्राला भेट देऊन पिके व जनावरांच्या नैसर्गिक व्यवस्थापनाचा अभ्यास केला. तसेच दहिगाव येथील सौ. वनिता काळे यांच्या शेतावर भेट देऊन जीवामृत तयार करण्याची पद्धत आणि देशी गाईंचे संगोपन याबाबतची प्रात्यक्षिके जाणून घेतली. सदर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी केव्हीकेचे शास्त्रज्ञ बडधे एस. डी., अभियंता राहुल पाटील, दहातोंडे नंदकिशोर, निबे नारायण, डॉ. चंद्रशेखर गावळी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. निविष्ठा निर्मितीपासून ते ब्रँडिंग आणि विक्रीपर्यंतची विविध कौशल्ये आत्मसात झाल्याने हे प्रशिक्षण ग्रामीण युवकांसाठी उद्योजकतेची नवी दारे उघडणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.