– ‘कॅग’च्या अहवालाचा दाखला देत वंचित बहुजन आघाडीची सरकारवर तीव्र टीका
– लाडकी बहीण योजना म्हणजे दुहेरी आर्थिक घोटाळा; सरकारवर गंभीर आरोप
अकोला (बाळू वानखेडे) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातींच्या (ST) विकासासाठी राखीव असलेला तब्बल ₹४,६०१.१३ कोटींचा निधी वळवण्यात आला असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. हा निधी १५ दिवसांत तातडीने मूळ विभागांकडे वर्ग न केल्यास सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास मंत्र्यांच्या घरांवर तीव्र मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा त्यांनी अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना पातोडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यावर थेट निशाणा साधला. अनुसूचित जाती-जमातींच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद असताना, या मंत्र्यांच्या डोळ्यांदेखत हा निधी इतरत्र पळवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
कॅगने (CAG) विधिमंडळात सादर केलेल्या राज्य आर्थिक लेखापरीक्षण अहवालाचा हवाला देत त्यांनी सांगितले की, योजनेच्या निश्चित बजेट तरतुदीपेक्षा तब्बल ₹३,५४१.१६ कोटींहून अधिक खर्च करण्यात आला असून, महिला व बाल विकास विभागाला याचे कोणतेही ठोस औचित्य देता आलेले नाही. सिस्टीममधील त्रुटींमुळे १४,२९८ पुरुषांना दरमहा ₹१,५०० प्रमाणे सुमारे ₹२१.४४ कोटींचे अयोग्य वाटप झाले असून, लक्षावधी अपात्र महिलांना लाभ देऊन तिजोरीचे नुकसान केले गेले आहे. तसेच जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान ₹१५,५८६ कोटींचा निधी थेट लाभार्थींना न देता ‘व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट्स’ (VPDAs) मध्ये पार्क करून ठेवण्यात आला, जो आर्थिक गैरव्यवहार आहे. रस्ते, शाळा, गृहनिर्माण व पाणीपुरवठा यांसारख्या पायाभूत सुविधांवरील भांडवली खर्च रोखून केवळ लोकप्रिय योजनांवर पैसे उधळल्यामुळे राज्याची आर्थिक तूट वाढत असल्याचे कॅगने स्पष्ट केल्याचे पातोडे म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या आकडेवारीनुसार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून एप्रिल-मे २०२५ मध्ये ₹४१०.३० कोटी, ९ सप्टेंबर २०२५ रोजी ₹३४४.३० कोटी, सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ मध्ये ₹४१०.३० कोटी, जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये ₹९८.४५ कोटी, मे-जून २०२६ मध्ये ₹३४४.७४ कोटी आणि १२ ऑगस्ट २०२६ रोजी ₹३४४.७४ कोटी असा टप्प्याटप्प्याने निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आला आहे.
अनुसूचित जाती-जमातींचा ₹४,६०१.१३ कोटींचा निधी तातडीने मूळ विभागांकडे वर्ग करावा आणि या निर्णयाची सविस्तर माहिती सरकारने सार्वजनिक करावी, अशी मागणी पातोडे यांनी केली. या मागणीची दखल न घेतल्यास मंत्र्यांच्या निवासांवर धडक मोर्चा काढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, माजी आमदार नतिकउद्दीन खतीब, अशोक सोनोने, अरुंधती शिरसाट आणि डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.