– महाराष्ट्रात पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांचे रणसंग्राम सुरू!
– ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान; तात्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू
मुंबई (बाळू वानखेडे): बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांमधील विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक जाहीर केले असून, यामध्ये महाराष्ट्रातील ५ महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे. आयोगाच्या निर्देशानुसार, संबंधित मतदारसंघांच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये तात्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या पत्रकानुसार, महाराष्ट्रातील ज्या ५ मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होत आहे, त्या सर्व क्षेत्रांमध्ये आचारसंहितेचे नियम आजपासूनच लागू झाले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग पदवीधर मतदारसंघ (चव्हाण सतीश भानुदासराव), पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ (अरुण गणपती लाड), नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ (अभिजित गोविंदराव वंजारी), अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ (सरनाईक किरण रामराव) आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ (जयंत दिनकर आसगावकर) या जागांचा समावेश आहे. या विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ०६ डिसेंबर २०२६ रोजी संपुष्टात येत असल्याने ही निवडणूक होत आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार टप्पे पुढीलप्रमाणे असणार आहेत:
- अधिसूचना प्रसिद्ध करणे: २९ सप्टेंबर २०२६ (मंगळवार)
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: ६ ऑक्टोबर २०२६ (मंगळवार)
- अर्जांची छाननी: ७ ऑक्टोबर २०२६ (बुधवार)
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत: ९ ऑक्टोबर २०२६ (शुक्रवार)
- प्रत्यक्ष मतदान: २३ ऑक्टोबर २०२६ (शुक्रवार) – सकाळी ८:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत
- मतमोजणी: २७ ऑक्टोबर २०२६ (मंगळवार)
- निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याचा दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२६ (शनिवार)
ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पूर्ण होईपर्यंत संबंधित मतदारसंघांच्या हद्दीत आचारसंहिता कायम राहणार असून, या कालावधीत निवडणूक आयोगाच्या नियमांचे कडक पालन करणे बंधनकारक असणार आहे. आचारसंहिता लागू असल्यामुळे या क्षेत्रांमध्ये नवीन प्रकल्पांची घोषणा, मतदारांवर प्रभाव टाकणारे धोरणात्मक निर्णय आणि बदल्यांसारखे निर्णय टाळावे लागतात. या निवडणुकीचे सविस्तर निर्देश निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.