-सहकारातील लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेस मैदानात; शासननियुक्त सदस्यांचे मतदान रद्द करून अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची मागणी
लोणार (वाजिद खान) : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणाचे पडसाद आता लोणारमध्येही उमटले आहेत. सहकार क्षेत्रातील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत लोणार शहर काँग्रेस कमिटीने निवासी तहसीलदार सौ. पर्डीकर यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या आदेशानुसार आणि बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या सूचनेनुसार शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस साहेबराव पाटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. गोकुळ दूध संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकास पॅनलला सभासदांनी स्पष्ट बहुमत दिले असतानाही अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर टाकली जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यातच पाच शासननियुक्त सदस्यांची नियुक्ती करून त्यापैकी चौघांना मतदानाचा अधिकार देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसने या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदविला आहे.
सभासदांचा कौल मोठा की सत्तेचा दबाव? असा सवाल उपस्थित करत सहकारी संस्थांमध्ये सभासदांच्या मताला सर्वोच्च स्थान असले पाहिजे. शासनाच्या हस्तक्षेपातून लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या पॅनलचे बहुमत कमकुवत करण्याचा प्रयत्न होता कामा नये, अशी भूमिका काँग्रेसने मांडली. निवेदनात शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणारा अध्यादेश तातडीने रद्द करावा, गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक कोणत्याही राजकीय दबावाशिवाय पारदर्शक पद्धतीने घ्यावी आणि स्पष्ट बहुमत मिळविलेल्या विकास पॅनलला कायदेशीररीत्या सत्ता स्थापन करण्याची संधी द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. सहकार क्षेत्र हे सभासदांच्या विश्वासावर आणि लोकशाही तत्त्वांवर चालते. राजकीय स्वार्थासाठी सहकाराच्या स्वायत्ततेशी तडजोड होऊ नये. हा प्रश्न केवळ एका दूध संघापुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातील संपूर्ण सहकार चळवळीच्या भवितव्याशी संबंधित असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले. यावेळी काँग्रेसचे एजाज खान, प्रा. विठ्ठल भानुसे, सोशल मीडिया सेलचे शहराध्यक्ष मोहसीन शहा, शुभम चाटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकशाहीचा कौल डावलू नका!
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सभासदांनी दिलेल्या स्पष्ट बहुमताचा आदर झाला पाहिजे. शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार दिल्यामुळे सहकार क्षेत्रातील लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शासनाने या प्रकरणात हस्तक्षेप करून लोकशाही मूल्यांचे रक्षण करावे आणि बहुमत मिळविलेल्या पॅनलला न्याय द्यावा, अशी मागणी लोणार शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांनी केली.