-प्रा. शरद देशपांडे सर यांचे निधन; हजारो विद्यार्थ्यांच्या मनात आठवणींचा दीप कायम तेवत राहणार!
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : काही माणसे केवळ शिकवत नाहीत, तर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर उमटवतात. त्यांच्या शिकवण्यातील शिस्त, शब्दांमधील दरारा आणि वागण्यातून मिळणारे संस्कार आयुष्यभर सोबत राहतात. वर्गात कठोर वाटणारी अशी माणसे प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या भविष्याची मनापासून काळजी घेणारी असतात. अशाच विद्यार्थी घडविण्याच्या ध्यासाने आयुष्य वेचलेल्या प्रा. शरद देशपांडे सर यांच्या निधनाने शिक्षणक्षेत्रातील एक शिस्तप्रिय, व्यासंगी आणि विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
श्रीक्षेत्र नेवासा येथे दि. २ जून १९४६ रोजी त्यांचा जन्म झाला. वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी विधी शाखेची पदवीही संपादन केली. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अध्यापन क्षेत्रात पदार्पण केले. १९७२ पासून बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि गेवराई येथील महाविद्यालयांत अध्यापनाची सेवा बजावली. तब्बल ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर २००७ मध्ये ते सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाले. देशपांडे सरांची ओळख म्हणजे करारी स्वभाव, वक्तशीरपणा आणि शिस्तीबाबत कोणतीही तडजोड न करणारे प्राध्यापक! त्यांच्या वर्गात विषय शिकवला जायचाच; पण त्यासोबत अभ्यासाची बैठक, जबाबदारीची जाणीव आणि जीवनाकडे पाहण्याची शिस्तही विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जायची. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी पुढे सार्वजनिक जीवनात आमदार, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती अशी महत्त्वाची पदे भूषवली, तर अनेकांनी शासकीय सेवेत उच्च पदांवर मजल मारली. विद्यार्थ्यांच्या यशातूनच शिक्षकाच्या आयुष्याचे खरे सार्थक होते, याचे देशपांडे सरांचे कार्य बोलके उदाहरण आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमांमधील सहभाग कायम राहिला. कुटुंबातही त्यांनी शिक्षण आणि कर्तृत्वाचा वारसा रुजवला. त्यांचे थोरले सुपुत्र इंजि. अजयकुमार हे सार्वजनिक बांधकाम विभागात फलटण, जि. सातारा येथे उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत आहेत, तर दुसरे सुपुत्र डॉ. अभयकुमार वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. दोन नातू अभियंते, तर दोन नाती डॉक्टर असून, पुढील पिढीनेही ज्ञान आणि कर्तृत्वाचा हा वारसा समर्थपणे पुढे नेला आहे.
विद्यार्थ्यांच्या मनातला ‘सर’ आणि घरच्या माणसासारखे ‘सुऱ्या’!
देशपांडे सरांच्या व्यक्तिमत्त्वातील कठोर शिस्तीमागे दडलेला प्रेमळ माणूस त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आठवणींतून प्रकर्षाने जाणवतो. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे बँक अधिकारी म्हणून घडलेले सुरेश भानप यांनी व्यक्त केलेल्या भावना या नात्यातील विलक्षण उब अधोरेखित करतात. ते म्हणतात, “मी कॉलेजचा बहिःस्थ विद्यार्थी होतो. मूळचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी असूनही सरांनी मला वाणिज्य शाखेची एबीसीडी शिकवली. बँकेच्या अंतर्गत परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी माझ्याकडून एकही पैसा न घेता स्वतःच्या घरी शिकवले. चहापाणी, प्रसंगी नाश्ता आणि जेवण देत अगदी हसतखेळत शिकवण्याचा आनंद दिला. मात्र, त्यांच्यातील शिस्त आणि आपुलकीचा एक वेगळाच अनुभव होता. ते बँकेत आले की ‘भानप साहेब’ आणि बँकेबाहेर भेटले की ‘सुऱ्या’… या दोन हक्काच्या, प्रेमळ संबोधनांपलीकडे त्यांनी मला कधीच वेगळे मानले नाही!”
सुरेश भानप यांच्या या आठवणी केवळ एका विद्यार्थ्याच्या भावना नाहीत, तर देशपांडे सरांच्या अध्यापनापलीकडील माणुसकीचा आणि नात्यांतील जिव्हाळ्याचा प्रत्यय देणाऱ्या आहेत. वर्गात शिस्तीचा धाक निर्माण करणारे सर, विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी स्वतःच्या घराची दारे खुली करणारे मार्गदर्शक आणि बाहेरच्या जगातही विद्यार्थ्याला आपलेपणाने हाक मारणारे स्नेही… त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे पैलू त्यांच्या जाण्यानंतर अधिक प्रकर्षाने जाणवतात. खरे तर शिक्षक निवृत्त होतो; पण त्याने घडवलेले विद्यार्थी कधीच निवृत्त होत नाहीत. त्याच्या शिकवणीचा, संस्कारांचा आणि मार्गदर्शनाचा ठसा त्यांच्या कार्यातून पुढेही उमटत राहतो. प्रा. शरद देशपांडे सरांनी ज्ञानदानातून घडवलेली पिढी, त्यांच्या शिस्तीचा वारसा आणि विद्यार्थ्यांशी जपलेले जिव्हाळ्याचे नाते हीच त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याची खरी कमाई आहे.
सर, तुमचा वर्ग संपला… पण तुम्ही शिकवलेला जीवनाचा धडा कधीच संपणार नाही!
प्रा. शरद देशपांडे सरांना विनम्र व भावपूर्ण श्रद्धांजली!
— बाळासाहेब खेडकर, पत्रकार, शेवगाव
