– पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या विशेष मोहिमेअंतर्गत चिखली पोलिसांची धडक कारवाई; १ लाख ३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त!
चिखली (महेंद्र हिवाळे) – अमली पदार्थांच्या विरोधात बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने हाती घेतलेल्या ‘मिशन परिवर्तन’ मोहिमेअंतर्गत चिखली शहरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. इंदिरानगर भागातील एकाच्या घरात टाकलेल्या छाप्यादरम्यान पोलिसांनी दोन किलोहून अधिक गांजा जप्त केला असून, या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ही मोहीम राबवली जात आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
इंदिरानगर येथील नसीम शेख हसन शेख (वय ३६ वर्षे) हा इसम आपल्या घरी अवैधरित्या गांजा बाळगून असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक भूषण गावंडे, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड, शासकीय पंच, अधिकृत वजन काटा धारक आणि फोटोग्राफर यांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला. या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून दोन किलो ६६ ग्रॅम वजनाचा, १ लाख ३ हजार ३०० रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण गावंडे, पोउपनि शरद भागवतकर, प्रवीण मोरे, अश्विनी गाडे, सचिन ठेंग आणि पोलीस अंमलदार अमोल गवई, विजय किटे, अजय इटावा, राहुल पायघन, प्रशांत धंदर, सुनील राजपूत, निलेश सावळे, ललिता खरात, पंचशीला ससाणे, रुपाली उगले यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे.