-पोलीस, स्ट्रायकिंग फोर्स, एसआरएफ व ४० होमगार्डचा सहभाग; शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी, यासाठी किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या वतीने दुसरबीड येथे मुख्य मार्गावर रूट मार्च काढण्यात आला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने केलेल्या या रूट मार्चमुळे गावातील सुरक्षा व्यवस्थेला बळकटी मिळाली.
बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार तसेच देऊळगाव राजा उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जून ठोसरे यांच्या उपस्थितीत मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १०.४५ वाजेदरम्यान रूट मार्च घेण्यात आला. गणेश विसर्जन मिरवणुकीचा मुख्य मार्ग, संभाव्य गर्दीची ठिकाणे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या भागांची पोलिसांनी पाहणी केली.
मोठ्या संख्येने सुरक्षा यंत्रणा सहभागी
या रूट मार्चमध्ये देऊळगाव राजा उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जून ठोसरे यांच्यासह किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय मातोंडकर, दोन पोलीस अधिकारी, १६ पोलीस अंमलदार, स्ट्रायकिंग फोर्सचे १५ अंमलदार, एसआरएफचे आठ जवान आणि गृहरक्षक दलाचे ४० सैनिक सहभागी झाले होते. मोठ्या संख्येने पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा दल सहभागी झाल्याने विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे दिसून आले.
पी.ए. सिस्टीमद्वारे शांततेचे आवाहन
दरम्यान, पोलीस ठाण्याच्या मोबाईल वाहनावरील पी.ए. सिस्टीमद्वारे ग्रामस्थांना गणेशोत्सव शांततेत आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे तसेच वाहतूक व सार्वजनिक सुव्यवस्थेला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले. गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा उत्सव असून, सर्व गणेश मंडळे, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडावा, असा संदेश पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर दुसरबीडमध्ये पोलिसांकडून करण्यात आलेल्या या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे दिसून आले.