-अंतिम सामन्यात चैतन्य गुरुकुलवर मात; विजयी संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आगेकूच
चिखली (राजेंद्र घुबे) : क्रीडा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या समन्वयाने शालेय तालुकास्तरीय मुला-मुलींचे हॉलीबॉल सामने चिखली येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर २२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत जानकीदेवी विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने विजय संपादन करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आगेकूच केली आहे.
या स्पर्धेत तालुक्यातील आदर्श विद्यालय, चिखली अर्बन इंग्लिश स्कूल, चैतन्य गुरुकुल आणि जानकीदेवी विद्यालयाच्या संघांनी सहभाग नोंदविला. अंतिम सामन्यात जानकीदेवी विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने चैतन्य गुरुकुलच्या संघावर एकतर्फी मात करत सामना सहजपणे जिंकला. या विजयासह जानकीदेवी विद्यालयाच्या संघाने तालुकास्तरावर विजयी होण्याचा मान पटकावला. विजयी संघामध्ये जानकीदेवी विद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. पूर्वी सुरडकर, अंकिता सुरडकर, खुशी वानखेडे, काव्या वानखेडे, ऋतुजा वानखेडे, भक्ती जावळे, प्रतीक्षा सुरडकर, वैष्णवी डवले, गौरी गाडेकर आणि गौरी विलास घुबे यांनी सहभाग नोंदविला. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजय मिळविल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष शेनफडराव घुबे, सचिव प्रा. उद्धव घुबे व प्राचार्य बबनराव लांडगे यांनी खेळाडू तसेच क्रीडा मार्गदर्शक पंजाबराव गुंजीकर आणि रामेश्वर कऱ्हाडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.