– ‘पालकमंत्र्यांना शोधा आणि बांधावर आणा’; चिखलीत शेतकऱ्यांचा तीव्र आक्रोश, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!
– हेक्टरी १ लाखाची भरपाई द्या, अन्यथा उद्रेक अटळ; शेतकरी संघटनांचा सरकारला थेट इशारा!
चिखली (अंकुश पाटील) : बुलढाणा जिल्ह्यात गेल्या ५० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन, कापूस, तूर आणि उडीद यांसारखी खरीप पिके पूर्णपणे करपण्याच्या मार्गावर आहेत. एकीकडे शेतकरी तीव्र आर्थिक संकटात सापडला असताना, दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री व सहपालकमंत्री मात्र बांधावर फिरकलेले नाहीत. “काजू-बदाम घ्या, पण आधी शेतकऱ्यांच्या बांधावर या!” अशी घणाघाती घोषणाबाजी करत चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि विविध शेतकरी संघटनांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर आणि क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार अर्ज सादर केला. तसेच तहसीलदार आणि स्थानिक पोलीस प्रशासनालाही निवेदन देऊन जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधले.
‘बैठका नको, प्रत्यक्ष संवाद साधा’
केवळ प्रशासकीय बैठका आणि कागदी चर्चांमध्ये वेळ न घालवता पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष शेतात येऊन पिकांची पाहणी करावी, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंत्री महोदयांचा शोध घेऊन त्यांना तातडीने बुलढाण्यात पाठवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. रब्बी हंगामातील आव्हाने, पाण्याची उपलब्धता आणि वाळत चाललेली पिके यावर केवळ शेतात जाऊनच वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या:
- बुलढाणा जिल्ह्यात तातडीने अधिकृत दुष्काळ जाहीर करावा.
- पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी.
- पालकमंत्री व सहपालकमंत्र्यांनी तत्काळ जिल्ह्यात येऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधावा.
- आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे, पाणी व आवश्यक शासकीय मदत प्राधान्याने उपलब्ध करून द्यावी.
या मागण्यांवर त्वरित ठोस निर्णय न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. या आंदोलनप्रसंगी देविदास कणखर, विनायक सरनाईक, उद्धव थुट्टे, मुरलीधर येवले, विठ्ठल सोळंकी, शेषराव शेळके, रवी टाले, राजू शेटे, गजानन कुटे, समंथा मोरे, रामदास शेळके, पांडुरंग घुबे, दत्ता शेळके, केशव म्हळसणे, पुरुषोत्तम म्हळसणे, मधुकर ठेंग यांच्यासह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.