-इतर जिल्ह्यांत १५ ऑगस्टला एक दिवस ध्वजारोहण; बुलढाणा जिल्ह्यात १३ ते १५ ऑगस्टदरम्यान ध्वजारोहणाच्या आदेशामुळे शिक्षण विभागात संभ्रम
सिंदखेडराजा (अशोक इंगळे) : बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १३ ते १५ ऑगस्टपर्यंत तीन दिवस ध्वजारोहण करण्यात यावे, असे आदेश आहेत. तर बुलढाणा जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांत ध्वजारोहण फक्त १५ ऑगस्ट रोजी करण्यात यावे, असे आदेश आहेत. त्यामुळे शिक्षण विभागात संभ्रम निर्माण झाला आहे.
बुलढाणा जिल्हा परिषद विभागाने एक शासकीय परिपत्रक जारी करून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शाळा, ग्रामपंचायती व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १३ ते १५ ऑगस्टपर्यंत तीन दिवस स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्याचे आदेश दिले आहेत. ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्टपर्यंत विविध शालेय स्पर्धा घेण्यात याव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा आदेश सकारात्मक असला, तरी ध्वजारोहणाबाबत मात्र संभ्रम निर्माण करणारा आहे. इतर जिल्ह्यांतील जिल्हा परिषद विभागाने तीन दिवस ध्वजारोहण करण्याऐवजी फक्त एक दिवस, १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यात यावे, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी एकच आदेश असावा
इतर जिल्ह्यांतील जिल्हा परिषद विभागाचे एक दिवस ध्वजारोहण करण्याचे आदेश असताना बुलढाणा जिल्ह्यात वेगळे आदेश देण्यात आल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी एकच आदेश असायला हवा.
भानुदास लव्हाळे
राज्य उपाध्यक्ष, जिल्हा परिषद शिक्षक संघटना