-जाहीर दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी; संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी तहसीलदारांकडे निवेदन
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह व अपशब्दयुक्त वक्तव्य केल्याबद्दल महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून, संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार, चिखली यांच्याकडे करण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांनी आपल्या मागण्या लोकशाही मार्गाने मांडाव्यात; परंतु समाजा-समाजात तेढ निर्माण करणारे शब्द वापरणे बंद करावे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे समाजाचे अग्रगण्य नेते असून, सामाजिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य राहिले आहे. अशा वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा व लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचू शकते. लोकशाही व्यवस्थेत मतभेद असणे स्वाभाविक आहे; परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधी, समाजनेते अथवा सामाजिक व्यक्तीविषयी अपमानास्पद भाषेचा उपयोग करणे ही सुसंस्कृत महाराष्ट्राच्या परंपरेला व सामाजिक ऐक्याला शोभणारी बाब नाही. अशा प्रकारची वक्तव्ये समाजा-समाजात तेढ निर्माण करणारी असून, संवादाची सामाजिक पातळी खालावत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
मनोज जरांगे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष सुभाष देव्हडे यांनी तहसीलदारांना निवेदन देताना केली. यावेळी दत्तात्रय करवंदे, राजेंद्र हरणे, नाना सोनुने, गजानन हरणे, अनंता सुरडकर, विजय हरणे, पवन हरणे, राजू माळोदे, गणेश भुजबळ, शिवा देव्हडे, विकास हरणे, विलास सोनुने, रविकांत वानखेडे, रमेश दिवटे, मुकुंदा एंडोले, अशोक सराफ, सुभाष गुंजाळकर, ऋषिकेश करवंदे, अविनाश एंडोले, सुनील एडोले, सुभाष डोंबळे, गोपाल देव्हडे, पंकज खोपाले, योगेश देव्हडे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.