-सरपंच सौ. ज्योती जाधव यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा येथील शासकीय, निमशासकीय व शैक्षणिक संस्थांमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशाची सेवा करणाऱ्या माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, असे आवाहन सरपंच सौ. ज्योती अमित जाधव यांनी केले होते. या उपक्रमाला सर्वांनी चांगला प्रतिसाद देत आज विविध ठिकाणी माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आज देशाचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैनिक जीवाची बाजी लावून लढत आहेत. साखरखेर्डा येथील अनेक सैनिकांनी कारगिल युद्ध असो की चीन युद्ध, प्रत्येक ठिकाणी सहभाग घेतला आहे. सैन्यात दाखल होणारा प्रत्येक युवक हा शेतकरी पुत्र असतो किंवा रोजमजुरी करून जीवन जगणाऱ्या सामान्य गरीब कुटुंबातील सदस्य असतो. सैन्यात भरती झाल्यानंतर आपण परत आपल्या मायभूमीत येणार की नाही, याची काळजी कधीच न करता केवळ देशरक्षणाचे ध्येय बाळगून तो आपली सेवा समर्पित करीत असतो. आज साखरखेर्डा गावातील अनेक युवक सैन्यातून सेवानिवृत्त होऊन आले आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी त्यांचा सन्मान व्हावा म्हणून सरपंच सौ. ज्योती अमित जाधव यांनी १३ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत ठराव घेऊन प्रत्येक शासकीय, निमशासकीय व शैक्षणिक संस्थेत माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा मानस व्यक्त केला. त्यानुसार प्रत्येक ठिकाणी विनंतीपत्र देण्यात आले.
आज १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर सेवानिवृत्त लष्करी अधिकारी लिंबाजी जाधव व सुधाकर राजगुरू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ललित अग्रवाल, मंगलसिंग राजपूत, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिजामाता विद्यालयात माजी विद्यार्थी म्हणून लिंबाजी जाधव यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव पंजाबराव हाडे, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. एसईएस हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेजमध्येही त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतीय उपडाकघर (पोस्ट ऑफिस) येथे माजी सैनिक अंबादास सुखदाने, श्री शिवाजी हायस्कूलमध्ये माजी सैनिक राहुल गवई, अनिकेत सैनिक स्कूलमध्ये माजी सैनिक अर्जुन गवई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. श्री पलसिद्ध प्राथमिक शाळा, मंडळाधिकारी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, सहकार विद्या मंदिर, अण्णाभाऊ साठे प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा, उर्दू हायस्कूल, भारतीय स्टेट बँक, जिल्हा केंद्रीय सहकारी बँक, पोलीस स्टेशन यासह विविध २४ ठिकाणी माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी सैनिक विलास गवई, राम दानवे, दिगंबर खरात, सखाराम खरात यांनाही ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली.
साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव चंद्रशेखर शुक्ल, श्री शिवाजी हायस्कूलचे अध्यक्ष डॉ. निलम महाजन, ठाणेदार युवराज रबडे, माजी सरपंच कमलाकर गवई, दाऊद कुरेशी, महेंद्र पाटील, सुनील जगताप, माजी उपसरपंच सय्यद रफीक, इब्राहिम शहा, गणपत अवचार, आयुब कुरेशी, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीप खंडारे, केंद्रप्रमुख संतोष सरकटे, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पोंधे, लखन राजपूत, ग्रामपंचायत अधिकारी अमित जाधव यांची उपस्थिती होती.