-ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजाला मानवंदना; विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती
बिबी (ऋषी दंदाले) : अद्विका महाविद्यालय, बिबी येथे भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर म्हणून ‘जय गुरुदेव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था’चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अनंता अनिरुद्ध मोहिते सर उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत गायन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी संस्थेच्या संचालिका श्रीमती पुष्पा रामेश्वर बनकर मॅडम, महाविद्यालयाच्या प्राचार्या, शिक्षकवृंद तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सांगत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाचे स्मरण केले. देशाच्या प्रगतीमध्ये युवा पिढीची भूमिका महत्त्वपूर्ण असून, विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, शिस्त व जबाबदारीची भावना जोपासावी, असे आवाहन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. उपस्थित सर्वांनी देशाची अखंडता, एकता आणि प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प केला. स्वातंत्र्यदिनानिमित्त महाविद्यालय परिसरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला.