-जिल्हास्तरीय उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवड; सिंदखेडराजा विश्रामगृहात अधिकाऱ्यांकडून अभिनंदन
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : महसूल विभागात क्षेत्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सिंदखेडराजा तहसील कार्यालयातील महसूल नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार तुकाराम वराडे यांची जिल्हास्तरीय उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल (दि. १३ ऑगस्ट) सिंदखेडराजा येथील विश्रामगृहात विविध विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
महसूल व वन विभागाच्या वतीने १ ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन’ साजरा करण्यात येतो. शासनाच्या दि. ३१ जुलै २०२६ रोजीच्या निर्णयाच्या अनुषंगाने महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात जिल्हास्तरीय निवड प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत सिंदखेडराजा तहसील कार्यालयातील महसूल नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे यांची उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. डॉ. वराडे यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे, गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार नितीन बडे, गजानन राऊत, चालक कैलास चव्हाण तसेच भूमी अभिलेख विभागाचे भूमापक प्रकाश शिंदे यांनी सिंदखेडराजा विश्रामगृह येथे त्यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रशासनातील कार्यक्षमतेला मिळाली जिल्हास्तरीय पावती
महसूल विभाग हा थेट नागरिकांच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाशी जोडलेला विभाग असून, विविध दाखले, महसूल नोंदी, जमीनविषयक कामकाज, शासकीय योजना आणि नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण यामध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. या पार्श्वभूमीवर डॉ. वराडे यांच्या कार्याची जिल्हास्तरावर झालेली दखल ही सिंदखेडराजा महसूल विभागासाठी गौरवास्पद मानली जात आहे.
१५ ऑगस्टला जिल्हास्तरीय सन्मान
जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडक अधिकारी-कर्मचाऱ्यांचा १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.१५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे गौरव करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर होणाऱ्या या सन्मान सोहळ्यात डॉ. प्रवीणकुमार वराडे यांचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरव होणार आहे. डॉ. वराडे यांच्या निवडीबद्दल सिंदखेडराजा तालुक्यातील अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख कार्याची ही जिल्हास्तरीय पावती असल्याची भावना व्यक्त होत आहे.