-वेदमंत्रांचा जयघोष; हरिनाम गजरात लक्ष्मीनारायण याग उत्साही व भक्तिमय वातावरणात संपन्न
आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री क्षेत्र आळंदी ब्रह्मवृंद अनुष्ठान मंडळाच्या वतीने माऊलींची पालखी आषाढवारीहून अलंकापुरीत दशमीला परत आल्यानंतर प्रथा-परंपरांचे पालन करीत एकादशीपासून तीन दिवसीय यज्ञाचे अनुष्ठान केले जाते. यानिमित्त ब्रह्मध्वज पूजन वेदमंत्रांच्या जयघोषात झाले. लक्ष्मीनारायण याग उत्साही, आनंदी व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
श्रीक्षेत्र आळंदी ब्रह्मवृंद अनुष्ठान मंडळाच्या वतीने ४३ व्या वर्षी ‘श्री लक्ष्मीनारायण’ यागाचे तीन दिवसीय आयोजन करण्यात आले. वे. मू. निखिल प्रसादे गुरुजी आणि वे. मू. चैतन्य जोशी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘योगीराज मंगल कार्यालय’ येथे यज्ञ वेदमंत्रांच्या जयघोषात संपन्न झाला. पहिल्या दिवशी यज्ञाचा प्रारंभ, सायंकाळी ह. भ. प. चिदंबरेश्वर साखरे महाराज यांचे प्रवचन आणि विदुला व डॉ. सारंग (अप्पा) जोशी यांचे भक्तिपूर्ण गायन झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी हवन, दुपारी वेदसेवा आणि सायंकाळी सत्काराचा कार्यक्रम झाला. यावेळी वे. मू. प्रकाशशास्त्री दंडगे गुरुजी, वे. मू. विवेक विश्वनाथशास्त्री जोशी, ज्येष्ठ नागरिक म्हणून शैलाताई व दत्तात्रय हरिभाऊ कुलकर्णी तसेच नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वे. मू. अशोकशास्त्री कुलकर्णी गुरुजी अध्यक्षस्थानी, तर वे. मू. अनंतशास्त्री मुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विश्वस्त बाळासाहेब पोफळे, यजमान प्रशांत मुळे तसेच अरविंद जोशी आणि संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन वे. मू. चितळे गुरुजी आणि कु. श्रावणी जोशी यांनी केले. तिसऱ्या दिवशी पूर्णाहुती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात आळंदीतील वेदपाठशाळेतील विद्यार्थी व गुरुजन उपस्थित होते.
यज्ञासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे (कबीरबुवा) व विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे शुभेच्छा व मार्गदर्शन लाभले. समीर आणि श्रीरंग सुनील तुर्की यांचे विशेष सहकार्य मिळाले. मंडळाचे अध्यक्ष वे. मू. चितळे गुरुजी, कार्याध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर जोशी, कोषाध्यक्ष बाळासाहेब पोफळे, विश्वस्त विजय कुलकर्णी, मुरलीधर प्रसादे व चैतन्य जोशी तसेच कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून यज्ञ परंपरांचे पालन करीत उत्साहात संपन्न झाला.