– साखरखेर्डा गावावर शोककळा; मामाकडे आलेल्या भाच्यावर काळाचा घाला!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथील वार्ड क्रमांक एक मधील देवीच्या मंदिरावर विद्युत रोषणाई करताना एका २३ वर्षीय युवकाचा विजेचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू झाला. नवरात्रोत्सव पूर्वसंध्येला ही दुर्घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जालना येथील रहिवासी सतीश विटेकर (वय २३) हा मामा दत्ता लष्कर यांच्याकडे आला होता. नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी वडार समाजाचे कुलदैवत जगदंबा माता मंदीर वार्ड क्रमांक एकमध्ये असून, त्या मंदिरावर विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय समाज बांधवांनी घेतला. मंदिरात विद्युत रोषणाई करताना त्या मंदिराच्या परिसरात मेहकर ते साखरखेर्डा ३३ के व्ही सबस्टेशनला जोडणारी वीज वाहक तार गेलेली आहे. सतीश हा मंदिरावर चढला असता चार ते पाच फुट अंतरावर असलेल्या ३३ केव्ही वीज प्रवाहाने अलगद आपल्या कवेत उचलून घेतले. काही कळण्यापूर्वी त्याचा खाली पडून मृत्यू झाला. ही घटना घडली असताना मामा दत्ता लष्कर आणि इतर नातेवाईक तेथेच उपस्थित होते. सतीश यास तातडीने चिखली येथे रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नवरात्रोत्सव पूर्व संध्येला ही घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, अंतिम संस्कार करण्यासाठी त्याचा मृतदेह जालना येथे नेण्यात आला आहे.