नवीन बोरा व आरती बोरा या दाम्पत्याने सलग 30 दिवस निरंकार उपवास करून राशीन संघाची शान वाढवली : प. पु. विधीजी म. सा.
कर्जत (प्रतिनिधी) : जैन धर्मामध्ये उपासनेस अनन्य साधारण महत्व आहे. एकासना, बेआसना, वास असे विविध प्रकारचे उपवास केले जातात. यामध्ये सर्वाधिक कठीण म्हणजे काही न खाता फक्त पाणी पिऊन तिविहारचे पचखान करून उपवास करणे. आजवर अनेक जैन बांधवांनी 5 दिवस 11 दिवस तर कोणी 21 दिवसाचे उपवास केले आहेत. मात्र राशीन मध्ये नवीन बोरा व आरती बोरा या दाम्पत्याने 30 दिवस (मासखमन) केले असून, याची पचकवणी आज संपन्न झाली.
राशीन येथील रसिक स्मृती या जैन स्थानकांमध्ये चातुर्मास साठी साध्वी महाराज विराजमान आहेत. समरथ गच्छाधीपती १००८ श्री
उत्तमचंदजी म.साब. यांच्या कृपा आशीर्वादाने व प. पु. विमलकवर जी म. सा., यांच्या आदेशाने राशीन येथे प.पु. विधीजी म. सा., प्रगतीजी म. सा., आणि जिनेशाजी म.साब. विराजमान असून त्यांच्या माध्यमातून दररोज प्रार्थना, प्रवचन, महिलांसाठी शिबिर, उपासना, तप आराधना, दान धर्म आराधना अशा प्रकारचे धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. राशीन येथील रसिक उद्योग समूहाचे संचालक नवीनकुमार रसिकलाल बोरा व त्यांच्या पत्नी आरती नवीनकुमार बोरा या दाम्पत्याने 30 दिवस काहींही अन्न न खाता फक्त गरम पाणी पिऊन सलग उपवास करून जैन समाजातील अत्यंत पवित्र व अवघड समजले जाणारे मासखमण हे व्रत केले आहे.
राशीन येथे 17 वर्षांनंतर चातुर्माससाठी म. साब विराजमान होण्याची संधी राशीन संघाला मिळाल्याने राशीन मधील जैन बांधव मोठया संख्येने उपासना करत आहेत. जैन समाजात आजपर्यत अनेकांनी 30 उपवास केले आहेत मात्र पती आणि पत्नी दोघांनी जोडीने मासखमण करण्याचा योग दुर्मिळ आहे, व तो योग राशीन संघात बोरा दाम्पत्याने आणला असल्याचे प.पु.विधीजी म.साब. यांनी आज उपवास समाप्तीच्या कार्यक्रमात सांगितले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने जैन समाजा सोबतच इतर धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोरा दाम्पत्याचे 30 दिवस उपवास निमित्त जैन समाजाने अत्यंत हर्षोल्लाहात सकाळी वरघोडा (मिरवणूक) काढण्यात आला. या नंतर स्थानकात प्रवचन संपन्न झाले. यावेळी अनेकांनी मनोगते व्यक्त करत स्व रसिकलालजी बोरा यांचे स्मरण करत, त्याच्या पश्चात त्याच्या पत्नी व नवीन कुमार यांच्या माता भारतीबाई बोरा यांनी ही मासखमन केल्याची आठवण करून देताना त्याच्या धार्मिक संस्कारामुळेच व साध्वीजीच्या कृपा आशीर्वादामुळे हे शक्य झाल्याचे अनेकांनी म्हटले तर शेवटी नविनकुमार बोरा यांनी सर्वांचे आभार मानले. राशीन येथील चातुर्मासात अनेक जण तपस्या करत असून मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असल्याची माहिती राशीन संघाचे अध्यक्ष प्रदीप मंडलेचा यांनी दिली.