निलंगा (तालुका प्रतिनिधी) – मागील तीन दिवसापासून निलंगा तालुक्यातील विविध गावात जोरदार अतिवृष्टी होत असून हजारो हेक्टरवरील खरिपांची पिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तर सिंदखेड येथे विजेच्या तारा तुटून म्हशीच्या अंगावर पडल्याने दोन म्हशी तर धानोरा येथे भिंत कोसळून दोन मेंढ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्गाची अवकृपा बळीराजावर झाल्याचे दिसून येत आहे. कधी गोगलगाय तर कधी रोगराई अन उरलेसुरले पीक अतिवृष्टीमध्ये पुर्णता पाण्याखाली जाऊन नासाडी झाल्याचे लातुर जिल्ह्यातील शेतकरी बांधवाचे चित्र पाहायला मिळत आहे. मागच्या तीन दिवसापासून सलग अतिवृष्टी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गुरुवारी (दि ८) रोजी तर पावसाने कहरच केला. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, हलगरा व निलंगा महसूल मंडळात दोन तासांमध्ये १०० मीमी पेक्षा कितीतरी जास्त धोधो पाऊस पडून जनजीवन विस्कळीत झाले. अनेक रस्तेच वाहून गेल्याने अनेक शेतकर्यांना शेतामध्ये रात्र जागून काढावी लागली.
तालुक्यातील सावनगीरा ते झरी रस्त्यावरील पुल व सावरी ते जामगा रस्त्यावरील पुल वाहून गेल्याने शेतकऱ्यांना येजा करण्यासाठी मोठी आडचण निर्माण झाली आहे. तालुक्यातील धानोरा येथे सततच्या संततधार पावसामुळे भिंत कोसळून मेंढपाळ शिवाजी बारतोंडे यांच्या दोन मेंढ्याचा जागीच मृत्यू झाला व सहा मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.तर सिंदखेड येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये विद्युत तारा तुटून थेट दोन म्हशीच्या अंगावर पडल्याने येथील परमेश्वर स्वामी यांच्या दोन्ही म्हशींचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी निलंगा पोलीस व तलाठी यांनी पंचनामा केला असून सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर नुकसान भरपाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवून संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असे महावितरणचे कार्यालयातून सांगण्यात आले आहे.