– महाबळेश्वरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भागवत यांची धडाकेबाज कारवाई
सातारा (जिल्हा प्रतिनिधी) – महाबळेश्वर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मशीद रोडवरील स्टेट बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. याप्रकरणी स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांनी पोलिसात तक्रार दिल्यावरून महाबळेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भागवत यांनी शिताफीने तपास करून, सराईत तीन चोरट्यांना अवघ्या सहा तासांच्याआत गजाआड केले. तीनही आरोपी परप्रांतीय असून, पोलिस त्यांची कसून चौकशी करत आहेत. ही टोळी एटीएम फोडण्यात निष्णांत असल्याचे दिसून आले आहे.
महाबळेश्वर बाजारपेठेत गणेश विसर्जनाची धामधूम सुरु असताना, ही धक्कादायक घटना घडली होती. सुभाषचंद्र बोस चौकातून मिरवणुकीस प्रारंभ होऊन गणेश विसर्जन मिरवणुका छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे पोचल्यानंतर, शनिवारी पहाटे दोन वाजता अज्ञात चोरट्यांनी मशीद रोडवरील स्टेट बँक एटीएममध्ये प्रवेश केला. यावेळी चोरट्याने जिन्सची पॅन्ट लाल टी शर्ट, परिधान करून रुमालाच्या साहाय्याने चेहरा झाकला होता. या एटीएम केंद्रात एकूण चार मशीन असून, त्यापैकी एटीएमच्या दारातच असलेल्या पहिल्या मशीनचा चोरट्याने कटावलीने पुढील भाग उघडून एटीएम मशीन फोडण्याचा प्रयन्त केला. बराच वेळ प्रयत्न करूनही एटीएम मधील रक्कम त्याच्या हाती लागली नाही. कुणीतरी येत असल्याची कुणकुण लागल्याने चोरटा व त्याचे साथीदार तेथून पसार झाले. याच दरम्यान एटीएम मधून आवाज आल्याने बँकेच्या सुरक्षारक्षकाने खिडकीमधून डोकावून पहिले असता, काही आक्षेपार्ह आढळून आले नाही, शनिवारी सकाळी बँकेच्या व्यवस्थापकांना सुरक्षारक्षकाने एटीएम मशीनचा पुढील दरवाजा उचकटला असल्याचा प्रकार व्यवस्थापकांना सांगितला. त्यानंतर तातडीने बँक व्यवस्थापकांनी एटीएममध्ये जाऊन पाहणी केली असता, एका मशीनचा पुढील लॉक तुटलेल्या अवस्थेत दिसला. परंतु आतील डिजिटल लॉक सुरक्षित असून, चोरी झाली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर स्टेट बँकेच्या व्यवस्थापकानी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रारदाखल केली.
या तक्रारी वरून महाबळेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भागवत यांनी तातडीने तपास हाती घेतला. स्टेट बँक एटीएम व या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पहिले असता, आढळून आलेल्या संशयितांची चौकशी त्यांनी सुरु केली. तांत्रिक तपासाच्या सहाय्याने आरोपींचा अचूक माग काढत, मुख्य आरोपीसह एकूण तीन आरोपी श्री भागवत यांनी अवघ्या सहा तासांच्याआत गजाआड केले. हे तीनही आरोपी परप्रांतीय असून, त्यांची चौकशी सुरु असल्याचे श्री भागवत यांनी सांगितले आहे. एटीएम फोडणारी टोळीच श्री भागवत व त्यांच्या सहकार्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गजाआड केल्याने सातारकरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
—————-
