-ड्रेनेज व्यवस्थापन अधिक सक्षम; चोकअप व सांडपाणी समस्यांवर तातडीने कार्यवाही शक्य
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी शहरातील स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आळंदी नगरपरिषदेला Vehicle Mounted Suction cum Jetting Machine प्राप्त झाली आहे.
स्वच्छ महाराष्ट्र मिशन (नागरी) २.०, नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून ही अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली असून, Aryan Pumps & Enviro Solutions Pvt. Ltd. या कंपनीमार्फत सदर वाहनाची बांधणी करण्यात आली आहे. ही मशीन TATA T.19 ULTRA या वाहनावर आधारित असून, ड्रेनेज वाहिन्यांमध्ये साचलेला गाळ, चिखल तसेच इतर अडथळे दूर करण्यासाठी तिचा उपयोग केला जाणार आहे. तसेच Suction आणि High-Pressure Jettingच्या माध्यमातून ड्रेनेज लाईनची प्रभावी स्वच्छता करण्यास या यंत्रणेची मदत होणार आहे.
शहरातील ड्रेनेज चोकअप, सांडपाणी वाहिन्यांमधील अडथळे आणि ओव्हरफ्लोच्या तक्रारींवर जलद व यांत्रिक पद्धतीने कार्यवाही करता येणार असल्याने नागरिकांना अधिक तत्पर सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना ड्रेनेजमध्ये उतरून हाताने सफाई करण्याची आवश्यकता कमी होणार असून, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही या मशीनचा मोठा फायदा होणार आहे. ड्रेनेज वाहिन्यांची नियमित स्वच्छता केल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी येण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार आहे. या यंत्रणेच्या उपलब्धतेमुळे बाहेरील यंत्रणा भाड्याने घेण्यावरील अवलंबित्व कमी होऊन नगरपरिषदेच्या दीर्घकालीन खर्चात बचत होण्यास मदत होईल. आपत्कालीन परिस्थितीतही ही मशीन तातडीने उपलब्ध असल्याने शहरातील ड्रेनेज समस्या वेळेत सोडविणे शक्य होणार असल्याचे आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले.