– गणेशोत्सवातील विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
नगर : नागापूर येथील राजमाता-शिक्षक कॉलनीमध्ये गणेशोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांनी कॉलनीच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देत संपूर्ण कॉलनीचा कायापालट करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कॉलनीचे अध्यक्ष संघर्ष साळवे यांनी नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी कॉलनीतील विविध विकासकामांबाबत नगरसेवक वाकळे यांना नागरिकांच्यावतीने निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना नगरसेवक वाकळे म्हणाले, “राजमाता-शिक्षक कॉलनीच्या विकासाकडे पूर्ण लक्ष दिले जाईल. कॉलनीतील ओपन स्पेसचे काँक्रिटीकरण करणे, तसेच अंतर्गत रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना पेव्हिंग ब्लॉक बसवून परिसराचा चेहरामोहरा बदलण्यात येईल.”
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संघर्ष साळवे म्हणाले, “आम्ही सर्वजण आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि यापुढेही राहू. निरर्थक राजकारण करत बसण्यापेक्षा आमचा भर केवळ कॉलनीच्या विकासावरच असेल.”
या दिमाखदार सोहळ्यास कॉलनीचे सहअध्यक्ष तथा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे आणि सचिव दिलीप लेकुरवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कॉलनीचे उपाध्यक्ष राजाभाऊ मोहिते, दिलीप दरंदले, हिरालाल सोनवणे, ईश्वर जायभाये, महेश नारखेडे, संदीप रोकडे, राजू नारखेडे, सौ. सविता सांगळे, सौ. मयुरी सोनवणे, श्रीमती गर्जे, सौ. सपना नऱ्हे, सौ. पूनम नारखेडे, काजल भिसे, सौ. संगीता लेकुरवाळे यांच्यासह कॉलनीतील मोठ्या संख्येने पुरुष, महिला आणि बालगोपाल उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भारती साळवे यांनी केले, तर विश्वनाथ कदम सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.