-बुलढाण्याला प्रदेश कार्यकारिणीत प्रतिनिधित्व; युवा नेतृत्वाला राज्यस्तरावर संधी
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या २०२६ सालच्या प्रदेश कार्यकारिणीची पदाधिकारी यादी जाहीर करण्यात आली असून, बुलढाणा जिल्ह्यातील शुभम जायभाये यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ही प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
प्रदेश कार्यकारिणीत विविध विभागांना प्रतिनिधित्व देताना कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच ठाणे-सिंधुदुर्ग विभागातील युवा पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याला विदर्भ विभागातून शुभम जायभाये यांच्या माध्यमातून महत्त्वाचे प्रतिनिधित्व मिळाले आहे. २०२६ च्या प्रदेश पदाधिकारी यादीत विविध पदांवर युवा कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदासाठी रत्नागिरीचे विक्रम जैन, पुण्याचे मयुर दौंडकर, कल्याणचे भावार्थ दौंड, बुलढाण्याचे शुभम जायभाये, छत्रपती संभाजीनगरचे मयुर वंझारी, लातूरचे सौरभ चौहान, वाशिमचे वैभव वायचाळ, वर्ध्याचे अंकुश ठाकुर, देवगडचे श्रेयस शाहकर आणि पुण्याचे सौरभ पुंडलिक यांचा समावेश आहे.
तसेच, प्रदेश महामंत्रीपदी नागपूरचे बादल राऊत, सोलापूरचे सुदर्शन यादव, पिंपरी-चिंचवडच्या तेजस्विनी दुर्गे आणि बीडचे दत्तप्रसाद जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदासाठी साताऱ्याचे अनीमेश कुलकर्णी, रत्नागिरीचे अव्दैत कुलकर्णी आणि नागपूर शहरचे अमेय विश्वरूप राणे यांची निवड करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील युवा नेतृत्वाला राज्यस्तरावर मिळालेल्या या संधीमुळे आगामी काळात जिल्ह्यातील युवा संघटनात्मक कामकाजाला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पक्षाची विचारधारा युवा वर्गापर्यंत पोहोचविणे, संघटन मजबूत करणे तसेच युवकांच्या प्रश्नांना संघटनात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रदेश पदाधिकाऱ्यांवर राहणार आहे.