-पिकांच्या सर्वेक्षणाला वेग; शेतकऱ्यांच्या नजरा आता नुकसानभरपाईकडे
चिखली (अंकुश पाटील) : खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसलेल्या चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना आता शासनाच्या मदतीची प्रतीक्षा लागली आहे. पावसाअभावी तसेच पिकांना आवश्यक त्या कालावधीत पाणी न मिळाल्याने हळद, सोयाबीन आणि तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दुष्काळग्रस्त पिकांचे संयुक्त पंचनामे आणि प्रत्यक्ष शेतशिवार सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
तालुक्यातील विविध गावांमध्ये महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शेतांवर जाऊन पिकांची पाहणी केली जात आहे. पिकांची सद्यस्थिती, नुकसान झालेल्या क्षेत्राचे प्रमाण आणि पिकांच्या नुकसानीची टक्केवारी याची नोंद पंचनाम्यात केली जात आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
पावसाने ओढ दिल्याने पिकांची अवस्था बिकट
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाची काहीशी समाधानकारक स्थिती असली, तरी त्यानंतर पावसाने मोठी उघडीप दिल्याने पिकांवर परिणाम झाला. सोयाबीन पिकाची वाढ खुंटली असून, अनेक शेतांमध्ये शेंगा भरण्याच्या अवस्थेतच पिकाला पाण्याचा ताण सहन करावा लागला. तुरीच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांनाही पाण्याअभावी उत्पादनात घट होण्याची चिंता सतावत आहे.
शेतकऱ्यांची पंचनामे अचूक करण्याची मागणी
“प्रत्यक्ष शेतावर येऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा करावा आणि पात्र शेतकऱ्यांचे नुकसान शासनाच्या नोंदीत अचूकपणे यावे,” अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. केवळ कागदोपत्री नोंद न करता प्रत्यक्ष नुकसानग्रस्त क्षेत्राचा सर्वे करून पंचनामे करण्यात यावेत, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नुकसानभरपाई कधी मिळणार?
संयुक्त पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या सर्वेक्षण व पंचनाम्याच्या कामात तलाठी वैशाली मगर (भरोसा भाग १), तलाठी सीमा सुरूशे (भरोसा भाग २), सहाय्यक सचिन तरमळे, संतोष थुटटे, पत्रकार अंकुश पाटील, विष्णू थुटटे, चंद्रकांत थुटटे आणि मंगेश थुटटे यांचा सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर शासनाच्या निकषानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, पंचनामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष मदत खात्यावर कधी जमा होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पंचनामे वेळेत पूर्ण करून नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला नियमानुसार मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.