-शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष नवनाथ जगताप यांच्याकडून गडावरील व्यवस्थेची पाहणी; महिला भाविकांच्या निवास, भोजन व सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि देवस्थान समितीकडून करण्यात आलेल्या विविध तयारीचा देवस्थानचे अध्यक्ष तथा धर्मदाय उपआयुक्त नवनाथ जगताप यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत राज्याच्या विविध भागांतून लाखो भाविक गडावर दाखल होणार असल्याने भाविकांच्या सोयी-सुविधा, सुरक्षितता, स्वच्छता आणि सुलभ दर्शन यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत मोहटादेवी गडावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. विशेषतः देवीच्या उपासनेसाठी अनेक महिला भाविक घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत गडावर मुक्कामी राहतात. त्यामुळे गर्दीचे नियोजन, निवास व्यवस्था, भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा तसेच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही त्रुटी राहू नये, याबाबत अध्यक्ष जगताप यांनी प्रशासनाला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या.
दर्शनरांग, पालखी मार्गासह विविध सुविधांची पाहणी
अध्यक्ष नवनाथ जगताप यांनी गडावरील दर्शनरांग, पालखी मार्ग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसादालय तसेच सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. भाविकांना दर्शनासाठी अनावश्यक गर्दी अथवा अडथळे निर्माण होऊ नयेत, दर्शन व्यवस्था सुरळीत राहावी आणि गर्दीच्या काळात भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गडावर येणाऱ्या भाविकांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक असून, नवरात्रोत्सव काळात स्वच्छता कर्मचाऱ्यांची पुरेशी नियुक्ती करून परिसरात सातत्याने स्वच्छता राखावी. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता अखंडित राहावी तसेच गर्दीच्या ठिकाणी आरोग्यविषयक सुविधा तत्काळ उपलब्ध होतील, याची खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मुक्कामी राहणाऱ्या महिला भाविकांच्या व्यवस्थेकडे विशेष लक्ष
मोहटादेवी गडावर नवरात्रोत्सव काळात हजारो महिला भाविक घट बसण्यासाठी आणि देवीच्या उपासनेसाठी मुक्कामी राहतात. या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवास आणि भोजन व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश अध्यक्ष जगताप यांनी दिले. महिला भाविकांसाठी निवासाची जागा सुरक्षित, स्वच्छ आणि पुरेशी असावी. भोजनाची गुणवत्ता, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि रात्रीच्या वेळी सुरक्षा व्यवस्था याकडे विशेष लक्ष द्यावे. महिला भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास त्यासाठी तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कर्मचारी व सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवावी, असे त्यांनी सांगितले.
२४ तास दर्शन व्यवस्था; प्रशासनाने समन्वय ठेवावा
नवरात्रोत्सवाच्या काळात गडावर भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने दर्शन व्यवस्था चोवीस तास सुरळीत ठेवण्याचे नियोजन देवस्थान समितीने केले आहे. गर्दीच्या कालावधीत विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा पथक आणि स्वयंसेवक यांच्यात प्रभावी समन्वय राहणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत भाविकांना गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे जगताप यांनी स्पष्ट केले. यावेळी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी नवरात्रोत्सवासाठी करण्यात आलेल्या संपूर्ण नियोजनाची माहिती अध्यक्षांना दिली. पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य पथके, दर्शन व्यवस्था, सुरक्षा तसेच भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सुविधांचा आराखडा त्यांनी सादर केला.
“प्रत्येक भाविकाला सुरक्षित आणि सुलभ दर्शन मिळावे”
यावेळी बोलताना अध्यक्ष नवनाथ जगताप म्हणाले, “मोहटादेवी गडावर नवरात्रोत्सवासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुरक्षित, सुलभ आणि समाधानकारक दर्शन मिळणे ही देवस्थानची प्राथमिकता आहे. लाखो भाविक गडावर येणार असल्याने नियोजनात कोणतीही कमतरता राहता कामा नये.” विशेषतः गडावर मुक्कामी राहणाऱ्या महिला भाविकांच्या निवास व भोजन व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. स्वच्छता, सुरक्षितता आणि आरोग्य सुविधांबाबत संबंधितांनी सतर्क राहावे. उत्सवाच्या काळात देवस्थान प्रशासन, अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणेने परस्पर समन्वय ठेवून चोवीस तास तत्पर राहावे. नवरात्रोत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि उत्साहात पार पडण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, असे त्यांनी सांगितले.
देवस्थान प्रशासन सज्ज
यावेळी देवस्थानचे विश्वस्त तथा गटविकास अधिकारी राजेंद्र धस, विश्वस्त शशिकांत दहिफळे, अॅड. प्रसन्न दराडे, अॅड. विक्रम वाडेकर, अॅड. कल्याण बडे, अशोक दहिफळे, बाबासाहेब दहिफळे, बाळू शेठ लाहोटी, अॅड. ऋतिका कराळे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे, लेखापाल संदीप घुले तसेच सुरक्षा विभागातील कर्मचारी उपस्थित होते. नवरात्रोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून, गडावरील विविध कामांना वेग देण्यात आला आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येचा विचार करून दर्शन, पाणी, स्वच्छता, आरोग्य, निवास, भोजन आणि सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे “श्री रेणुका विजयते”च्या जयघोषात लाखो भाविकांचे स्वागत करण्यासाठी मोहटादेवी गड सज्ज झाला आहे.