-आळंदी पंचक्रोशी परिसर शोकाकुल; दुकाने, व्यापारी आस्थापना व संस्थांचा स्वयंस्फूर्त बंदमधून सहभाग
आळंदी (अर्जुन मेदनकर) : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर आलेली भरती आणि पाण्याच्या उंचीचा अंदाज न आल्याने आळंदीतील विनर्स अकॅडमी या खासगी क्लासमधील आठ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे आळंदी देवाची, केळगाव आणि चऱ्होली खुर्द परिसरातील नागरिक, व्यापारी, दुकानदार तसेच विविध आस्थापनांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून शोक व्यक्त केला. अत्यावश्यक सेवा मात्र बंदमधून वगळण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आळंदीतील चावडी चौक, मंदिर परिसर, भराव रस्ता, नगरपरिषद व्यापारी संकुले, महाद्वार चौक, बाजारपेठ, वडगाव रस्ता, मरकळ रोड, प्रदक्षिणा मार्ग, शिवतेज चौक, इंद्रायणी नदी घाट, चाकण रस्ता चौक आदी ठिकाणी तसेच पंचक्रोशी परिसरात व्यापारी, व्यावसायिक, संस्था आणि नागरिकांनी दुकाने बंद ठेवून शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात सहभाग नोंदविला.
नातेवाईकांची आळंदी पोलीस ठाणे व अकॅडमी परिसरात गर्दी
दिवेआगर येथे सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी रात्रीपासून विनर्स अकॅडमी परिसरात, तर पहाटे आळंदी पोलीस ठाण्याच्या परिसरात गर्दी करून घटनेची माहिती घेतली. पहाटे उर्वरित विद्यार्थी सुरक्षित प्रवास करून आपापल्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. दिवेआगर येथून गुरुवारी रात्री उशिरा निघालेली सहलीची बस शुक्रवारी सकाळी आळंदीत दाखल झाली. बस आल्यानंतर विद्यार्थ्यांचे मृतदेह एकापाठोपाठ एक आळंदीत आणण्यात आले. हे दृश्य पाहून उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या आठवणी सांगताना अनेकांचे अश्रू अनावर झाले.
हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
केळगाव व आळंदी परिसरात सकाळी रुग्णवाहिकांमधून मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह आणण्यात आले. यातील आळंदी येथील चार, केळगाव येथील दोन, अमरावती येथील एक आणि श्रीरामपूर येथील एका विद्यार्थ्यावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत शोकाकुल वातावरणात हे अंत्यविधी पार पडले. अंत्यविधीसाठी आळंदी आणि परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. निष्पाप आठ विद्यार्थ्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण आळंदी परिसरावर शोककळा पसरली होती.
आळंदी पंचक्रोशीत बंद पाळून श्रद्धांजली
दिवेआगर येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांचे अंत्यविधी शोकाकुल वातावरणात करण्यात आले. यामध्ये चार विद्यार्थ्यांचे अंत्यविधी आळंदी येथे, दोन विद्यार्थ्यांचे केळगाव येथे, तर अमरावती आणि श्रीरामपूर येथे प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह नागरिक, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दुर्घटनेमुळे आळंदी पंचक्रोशीवर शोककळा पसरली. आळंदी, केळगाव आणि चऱ्होली खुर्द येथील ग्रामस्थांनी बंद पाळून विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. विविध आस्थापना, संस्था, व्यक्ती आणि पदाधिकाऱ्यांनीही बंदमध्ये सहभागी होत शोक व्यक्त केला.
अंत्यसंस्काराची ठिकाणे
आळंदी येथील स्मशानभूमीत सुमित भरत अहिरे, तन्मय दत्तात्रय वहिले, प्रणव रामदास बनसोडे आणि कैवल्य सतीश वासनकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. केळगाव येथे सोहम तुकाराम भांडवलकर आणि राजवीर युवराज वहिले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यश किरण वानखेडे यांच्यावर अमरावती येथे, तर कौस्तुभ संदीप दौंड यांच्यावर श्रीरामपूर येथे त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.