-आठ दुर्दैवी विद्यार्थ्यांवर अंत्यसंस्कार; आळंदी पंचक्रोशी परिसर शोकाकुल
आळंदी (अर्जुन मेदनकर) : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर भरती आणि खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पुण्यातील ‘विनर्स अकॅडमी फॉर ११th अँड १२th’ या कोचिंग क्लासच्या आठ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज आळंदी शहर व परिसर पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता.
महाद्वार चौक, भराव रस्ता बाजारपेठ, वडगाव रस्ता, मरकळ रोड, प्रदक्षिणा मार्ग, नगरपालिका चौक, शिवतेज चौक, इंद्रायणी नदी घाट परिसर आणि चाकण चौक येथील व्यापारी, व्यावसायिक, संस्था आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने व व्यवसाय बंद ठेवून शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात सहभाग नोंदवला.
नातेवाईकांची आळंदी पोलीस ठाण्यात गर्दी
घटनेची माहिती मिळताच काल रात्रीपासून विनर्स अकॅडमी येथे, तसेच आज पहाटेपासून आळंदी पोलीस ठाण्यात सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांचे नातेवाईक, ग्रामस्थ आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने जमा झाला होता. दिवेआगर येथून गुरुवारी रात्री उशिरा निघालेली सहलीची बस शुक्रवारी सकाळी आळंदीत पोहोचली. बस दाखल होताच आणि विद्यार्थ्यांचे मृतदेह एकापाठोपाठ एक आळंदीत आणले जात असताना उपस्थितांचा धीर सुटला. अनेक नागरिक व मित्र मयत विद्यार्थ्यांच्या आठवणी सांगताना भावुक झाले. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहत होत्या.
हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
केळगाव व आळंदी परिसरात शुक्रवारी सकाळी क्रमाक्रमाने रुग्णवाहिकांमधून मयत विद्यार्थ्यांचे मृतदेह आणण्यात आले. यातील केळगाव येथील दोन आणि आळंदी येथील दोन, अशा एकूण चार विद्यार्थ्यांवर सकाळी १० वाजेच्या सुमारास अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीसाठी आळंदी आणि परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. निष्पाप आठ विद्यार्थ्यांचा अशा अकाली मृत्यू झाल्याने संपूर्ण आळंदी पंचक्रोशी परिसरावर शोककळा पसरली आहे.