-पीक पेरा नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन; तहसीलदार अजित दिवटे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : तालुक्यात दुष्काळ आणि टंचाईसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मिळणारी मदत पात्र शेतकऱ्यांपर्यंत वेळेत आणि पारदर्शकपणे पोहोचविण्यासाठी महसूल प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. मदतीपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची ई-पीक पाहणी अर्थात पीक पेरा नोंदणी तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार अजित दिवटे यांनी केले आहे.
दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून मदत किंवा पीक नुकसानभरपाई वितरित करताना शेतातील पिकांची अधिकृत नोंद महत्त्वाची ठरते. ई-पीक पाहणी तसेच महसूल अभिलेखातील पीक पेऱ्याच्या नोंदीच्या आधारे पात्रतेनुसार मदत देण्याची कार्यवाही केली जाते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी अद्याप झालेली नाही किंवा अपूर्ण आहे, त्यांनी विलंब न करता संबंधित महसूल कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गावातील संबंधित तलाठी, महसूल सेवक (कोतवाल) तसेच पीक पाहणी सहाय्यकांशी संपर्क साधावा. आपल्या शेतातील पिकांची नोंद अचूक झाली आहे की नाही, याची खातरजमा करून घ्यावी. नोंदणीमध्ये काही त्रुटी किंवा अडचण असल्यास ती संबंधित कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून मिळणारी मदत ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अशा वेळी केवळ पीक पेरा नोंदणी अपूर्ण राहिल्यामुळे पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी शेतकऱ्यांनीही प्रशासनाच्या या मोहिमेला सहकार्य करण्याची गरज आहे. महसूल प्रशासनाकडून पीक नोंदणीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. “दुष्काळाच्या किंवा शासकीय मदतीच्या काळात ई-पीक पाहणीची नोंद ही शेतकऱ्यांच्या हक्काच्या मदतीचा महत्त्वाचा आधार आहे. गावातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या तलाठी किंवा पीक पाहणी सहाय्यकांशी संपर्क साधून नोंदणी वेळेत पूर्ण करावी. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना शासनाची मदत वर्ग करण्याची कार्यवाही सुलभ होईल,” असे तहसीलदार अजित दिवटे यांनी सांगितले. दरम्यान, तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या शेतातील पिकांची नोंद वेळेत पूर्ण करून घ्यावी आणि भविष्यात मदत मिळताना कोणतीही प्रशासकीय अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे महसूल प्रशासनाने आवाहन केले आहे.