-अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी प्रा. आदिती पोहरे यांना उमेदवारी
मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) : काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी राज्यातील तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघातून प्रा. आदिती ऋषिकेश पोहरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
राज्यातील पाच विधानपरिषद जागांसाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्याची ६ ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. दरम्यान, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. काँग्रेस पक्षाने मात्र विधानपरिषदेसाठी आपल्या तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज, २ ऑक्टोबर रोजी तीन उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघातून प्रा. आदिती ऋषिकेश पोहरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्या माजी मंत्री तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या असून, ‘देशोन्नती’चे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांच्या सूनबाई आहेत. दरम्यान, नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी अभिजीत वंजारी, तर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. एकंदरीत, काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात नेहमीच उशीर होत असल्याने प्रचारासाठी वेळ कमी मिळतो आणि त्याचा परिणाम निवडणुकीत पक्षाला भोगावा लागतो, अशी चर्चा होत असते. यावेळी मात्र काँग्रेसने उमेदवारांची नावे तुलनेने लवकर जाहीर केल्याने पक्षाने सध्या तरी आघाडी घेतल्याचे चित्र असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.