-गुरांसह वन्यप्राण्यांसाठी पाणीसाठा राखीव ठेवण्याची गरज; तलावांमधील पाणी उपसा बंद करण्याची नागरिकांची मागणी
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा परिसरात अनेक ठिकाणी पाझर तलाव आणि सिंचन तलाव आहेत. परंतु, एकाही तलावात पुरेसा पाणीसाठा शिल्लक नाही. सर्वच तलावांनी तळ गाठला असून, उर्वरित पाणी राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
साखरखेर्डा येथे गायखेडी, महालक्ष्मी, शिंदी, पिंपळगाव सोनारा तसेच गुंज माथा शिवारातील दोन पाझर तलाव अशा छोट्या-मोठ्या पाझर तलावांसह सिंचन तलाव आहेत. यावर्षी अपेक्षित प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे सर्वच तलावांनी तळ गाठला आहे. या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर गुराढोरांची संख्याही मोठी आहे. सध्या अनेक पाझर तलावांमधून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू आहे. हा पाणी उपसा असाच आणखी एक महिना सुरू राहिल्यास एकाही तलावात पाणीसाठा शिल्लक राहणार नाही, अशी चिंता नागरिकांकडून व्यक्त होत आहे. गुंजमाथा शिवारातील तलावात अनेक मोटारपंप सुरू आहेत. तसेच महालक्ष्मी आणि गायखेडी तलावातही अनेक मोटारपंपांद्वारे पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे या तलावांमधील उर्वरित पाणीसाठा राखीव ठेवण्यात यावा, अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.
पाणी उपसा रोखण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मागणी
तलावांमधील पाणी उपसा बंद करण्यासाठी या भागातील कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात यावा, जेणेकरून तलावांमध्ये पाणीसाठा शिल्लक राहील, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी सिंचन विभाग, देऊळगाव राजा यांनी आवश्यक पाऊल उचलावे, अशी रास्त मागणी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी केली आहे.