OTS आणि तफावतीच्या फेऱ्यात शेतकरी उध्वस्त; विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वात बँक व्यवस्थापकाला घेराव, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
चिखली (अंकुश पाटील) : राज्य शासनाने दोन लाख रुपयांपर्यंतची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली असली, तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीतील सावट आणि तफावतीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. बँकेची मुद्दल रक्कम, कर्जमाफीच्या यादीतील रक्कम आणि KYC केल्यानंतर समोर आलेली रक्कम यात मोठी तफावत आढळल्याने, सोमवारी (दि. ३ ऑगस्ट) क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेलसुर येथील स्टेट बँक शाखेवर धडक मोर्चा नेऊन शाखा व्यवस्थापकांना घेराव घालण्यात आला. “तफावतीची रक्कम बँका ‘वन टाईम सेटलमेंट’ (OTS) किंवा ‘हेअरकट’च्या माध्यमातून भरणार असल्या तरी, यामुळे शेतकऱ्यांचा CIBIL (सिबील) स्कोर कायमचा खराब होणार आहे. या भविष्यातील नुकसानीस जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी बँक प्रशासनाला विचारला.
क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, नितीन राजपूत, संतोष शेळके आणि अरुण नेमाने यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी बँकेत ठिय्या मांडला. या प्रसंगी बँक प्रशासनासमोर खालील मागण्या मांडण्यात आल्या:
- यादी जाहीर करा: मुद्दल, कर्जमाफीची रक्कम आणि KYC नंतरच्या रक्कमेतील तफावतीची सविस्तर यादी तातडीने प्रसिद्ध करावी.
- CIBIL सुरक्षेची लेखी हमी: २ लाखांच्या आतील कर्ज असलेल्या कोणत्याही शेतकऱ्याचा CIBIL स्कोर खराब होणार नाही, याची लेखी हमी बँक प्रशासनाने द्यावी.
- OTS ऐवजी सरसकट रक्कम: ‘हेअरकट’ किंवा OTS च्या माध्यमातून रक्कम कमी न करता शासनाने घोषित केलेली रक्कम सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.
- नवे पीक कर्ज उपलब्ध करा: ज्या शेतकऱ्यांचे KYC पूर्ण झाले आहे, त्यांची रक्कम खात्यावर वर्ग करून त्यांना तात्काळ नवीन पीक कर्ज मंजूर करावे.
शासनाच्या या अजब धोरणावर सडकून टीका करताना विनायक सरनाईक म्हणाले,
“एकीकडे सरकार २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीचा गवगवा करत आहे आणि दुसरीकडे तफावतीची रक्कम बँका OTS मधून भरत आहेत. OTS नोंदणीमुळे शेतकऱ्यांचे सिबील क्रेडिट रेकॉर्ड खराब होईल. परिणामी, भविष्यात मुलांचे शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज किंवा इतर व्यावसायिक कर्जे मिळणे बंद होईल. ही कर्जमाफी नसून शेतकऱ्यांची उघड फसवणूक आहे. उद्या सिबील खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा सावकाराच्या दारी जाण्याची वेळ आल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाने घ्यावी आणि बँकांना तसे स्पष्ट आदेश द्यावेत.”
शेलसुर बँकेतील या आंदोलनादरम्यान मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी रवींद्र अण्णा काळे, सतीश घाडगे, अंकुश घाडगे, नितीन चव्हाण, शिवशंकर घाडगे, पवन भाकरे, नेताजी कापसे, शिवाजी घाडगे, लक्ष्मण रींढे, हरिदास नेमाने, कैलास घाडगे यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.