• आयुष्यभर मारुती मंदिराची सेवा, चिमुकल्यांना आपुलकी आणि गावाला निरपेक्ष प्रेमाचा आधार देणारे आप्पाजी ‘शिवैक्य’; अंत्यसंस्कारास ग्रामस्थ भावूक!
साखरखेर्डा (अशोक इंगळे): स्थानिक ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आणि सर्वांच्या परिचयाचे असलेले ज्येष्ठ पुजारी बालब्रह्मचारी कै. किटकूल आप्पा हल्लौर यांचे दुःखद निधन झाले. निष्काम सेवा, निस्पृह स्वभाव आणि बेधडक वक्तृत्वामुळे संपूर्ण गावात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे आप्पाजी अनंतात विलीन झाले असून, त्यांच्या निधनाने साखरखेर्डा व परिसरात शोककळा पसरली आहे. आज अत्यंत भावूक वातावरणात त्यांच्यावर अंतिम संस्कार पार पडले.
जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या शाळेसमोर असलेल्या श्री मारुती मंदिरामध्ये किटकूल आप्पांचे दीर्घकाळ वास्तव्य होते. अगदी पहाटेच्या वेळी मारुतीरायाची पूजा-अर्चा करून दिवस उजाडताच गावातील इतर सर्व देवालयांमध्ये अगरबत्ती लावून सेवा अर्पित करणे, हा त्यांचा नित्यक्रम होता. जगद्गुरू श्री पलसिद्ध स्वामी धर्मपीठातून आपल्या सेवेची सुरुवात करणाऱ्या आप्पाजींनी वॉर्ड क्रमांक १ मधील पुरातन श्री आसरा माता देवस्थानासह गावातील अनेक मंदिरांमध्ये निरपेक्ष वृत्तीने पूजा-अर्चा व धार्मिक सेवा पार पाडली.
शाळेसमोरील मारुती मंदिराच्या पायथ्याशी गोळ्या-बिस्किटांचा छोटा व्यवसाय करत असताना शाळेतील लहान मुलांना मोफत चॉकलेट वाटणे, हा त्यांच्या आनंदाचा भाग होता. अंगात भगवे वस्त्र, कुबडा देह आणि चेहऱ्यावर प्रामाणिकतेचे तेज असलेल्या आप्पाजींनी आयुष्यभर कोणत्याही मोहाशिवाय जीवन जगले. सणासुदीच्या काळात ते आपुलकीने ग्रामस्थांच्या घरी सवडदला जात असत. अत्यंत स्वाभिमानी असलेल्या आप्पाजींनी कधीही कुणाची दया किंवा अनावश्यक मदत स्वीकारली नाही. काही महिन्यांपूर्वी एका दानशूर व्यक्तीने त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली होती, परंतु आधार कार्ड लिंक नसल्याने अडचणी आल्यावर स्थानिक पत्रकारांनी व बँक कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन त्यांचे आधार कार्ड काढून दिले व खाते पूर्ववत केले. मात्र, खात्यातील पैसे सुरक्षित ठेवून त्यांनी अत्यंत साधेपणाने आपले उर्वरित जीवन कंठले.
ना आर्तता, ना हंबरडा… अशा अत्यंत शांत व भावूक वातावरणात विथनाथू आप्पा जितकर व इतर समाजबांधवांच्या पुढाकाराने एका वाहनाने आप्पाजींचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्यात आले. तेथे श्रीमज्जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी मठातील स्वामींच्या विविध मंत्रोच्चारात त्यांच्यावर दफनविधी पार पडला. शरीरावरील कपड्यांव्यतिरिक्त आयुष्यात काहीही शिल्लक न ठेवणाऱ्या या निष्काम सेवकास संपूर्ण साखरखेर्डा गावाने अश्रूपूर्ण नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.