-विविध मान्यवरांची उपस्थिती; पत्रकार भवनासाठी आमदार राजेश बकाने यांचे पाठपुराव्याचे आश्वासन
वर्धा (प्रकाश कथले) : “सगळ्यांसाठी सगळं आहे; पण पत्रकारांसाठी जिल्हा मुख्यालयात स्वतंत्र पत्रकार भवन नाही. समाजासाठी कार्य करताना पत्रकारांना अनेकदा धोका पत्करावा लागतो. अशा परिस्थितीत पत्रकारांसाठी भविष्य निर्वाह निधीचे कवच, जिल्हा स्तरावर पत्रकार भवन तसेच मुंबईत भव्य पत्रकार भवन उभारणे गरजेचे आहे. या महत्त्वाच्या विषयांसाठी इतर लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मी स्वतः पाठपुरावा करणार आहे,” अशी ग्वाही आमदार राजेश बकाने यांनी दिली.
वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने विकास भवन येथे आयोजित कौटुंबिक स्नेहमिलन व पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वितरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, ज्येष्ठ समाजसेवक सुनील बुरांडे, संघटनेचे कोषाध्यक्ष इक्राम हुसैन, उपाध्यक्ष रमेश निमजे आणि गजानन गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार बकाने म्हणाले की, पत्रकारांचे आयुष्य सततच्या धावपळीचे असते. त्यामुळे त्यांना कुटुंबासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. अशा परिस्थितीत कौटुंबिक स्नेहमिलनासारखे उपक्रम पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी आपल्या मनोगतात अशा स्नेहमिलनातून पत्रकारांच्या कुटुंबीयांमध्ये आपुलकी आणि स्नेहाचे नाते अधिक दृढ होत असल्याचे सांगितले. पत्रकारांच्या हितासाठी आपण कायम सहकार्य करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. ज्येष्ठ समाजसेवक सुनील बुरांडे यांनी पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी आणि त्यांच्या पाल्यांसाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन आवश्यक असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे दैनंदिन ताणतणाव दूर होऊन आनंदाचे वातावरण निर्माण होते, असे ते म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते संघटनेतील सदस्यांच्या नर्सरी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वॉटर बॉटल आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. आमदार राजेश बकाने यांनीही या उपक्रमासाठी विशेष योगदान दिले. साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख, रवींद्र चांदेकर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण धोपटे यांनी केले, तर सूत्रसंचालन संघटन सचिव डॉ. आनंद इंगोले यांनी केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपाध्यक्ष रमेश निमजे, सहसचिव प्रफुल्ल व्यास, कार्यकारिणी सदस्य आशिष पावडे, रुपेश खैरी, सहसचिव नरेंद्र मते, जमीर शेख, राहुल काशीकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.