-पूज्य मयूरेश विसपुते गुरूजींच्या सान्निध्यात दोन दिवसीय आध्यात्मिक अनुष्ठान; १०८ कुंडीय श्री भैरव चंडी महायज्ञाचे आयोजन
आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री पीतांबरा बगलामुखी शक्ती पीठम, अहिल्यानगर यांच्या वतीने पूज्य श्री मयूरेश विसपुते गुरूजी यांच्या दिव्य सान्निध्यात दोन दिवसीय आध्यात्मिक अनुष्ठान अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाले. सुमारे १४ वर्षांनंतर गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या विशेष अनुष्ठान सोहळ्याला साधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी पीठमच्या साधक परिवाराने गुरु-परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करत गुरुमंडल पूजन विधी संपन्न केला. ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या आळंदी क्षेत्राचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करताना गुरूजी म्हणाले की, हे क्षेत्र आजही चैतन्यमय असून प्रामाणिक साधकाला माऊलींच्या दिव्य उपस्थितीचा अनुभव प्राप्त होतो. गुरु-तत्त्वाशी एकरूप होण्यासाठी श्रद्धा, साधना आणि समर्पण या त्रिसूत्रीचे महत्त्व त्यांनी यावेळी साधकांना पटवून दिले. श्री गणेश चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर साधकांनी सामूहिक महागणपती तर्पण तसेच अत्यंत दुर्मिळ आणि गुप्त मानल्या जाणाऱ्या महागणपती पात्रसादन पूजनाचा विधी भक्तिभावाने पार पाडला. संपूर्ण परिसर मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
श्री पीतांबरा बगलामुखी शक्ती पीठमचे पीठाधीश पूज्य मयूरेश विसपुते गुरूजी हे श्रीविद्या, दशमहाविद्या, तंत्रसाधना आणि सनातन वैदिक परंपरेच्या जतन, प्रचार व प्रसारासाठी कार्यरत आहेत. आदिशक्ती श्री भुवनेश्वरीच्या महिम्याचा प्रसार, पात्र साधकांना श्रीविद्या व दशमहाविद्या साधनेचा मार्ग उपलब्ध करून देणे तसेच प्रत्येक साधकाने आपल्या अंतर्मनातील दैवी चैतन्याचा अनुभव घेत जीवन साधना, सेवा आणि ईश्वरानुभूतीचे केंद्र बनवावे, हा या पीठमचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या ध्येयातून उभे राहत असलेले श्री पीतांबरा बगलामुखी शक्ती पीठम हे साधना, संस्कार आणि आत्मबोधाचे महत्त्वपूर्ण आध्यात्मिक केंद्र म्हणून विकसित होत आहे. गेल्या अकरा वर्षांपासून श्री पीतांबरा बगलामुखी शक्ती पीठमतर्फे श्री कालभैरव जयंती महोत्सव भक्तिभावाने साजरा केला जात आहे. यंदा या महोत्सवाचे बारावे वर्ष असून, पूज्य मयूरेश विसपुते गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत १०८ कुंडीय श्री भैरव चंडी महायज्ञासह विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या आध्यात्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गुरूजींनी सर्व भाविकांना केले.