-तळवडे येथील ज्योतिबा मंदिरात चातुर्मासभर विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन
आळंदी (अर्जुन मेदनकर) : चातुर्मासानिमित्त आळंदी परिसरातील विविध मंदिरांप्रमाणेच तळवडे येथील ज्योतिबा नगरमधील श्री ज्योतिबा मंदिरातही विविध धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, कार्तिकी एकादशीपर्यंत भाविक साधकांना धार्मिक पर्वणीचा लाभ मिळणार असल्याची माहिती मंदिराचे मुख्य पुजारी नवनाथ महाराज भालेकर यांनी दिली.
ज्योतिबा नगर येथील श्री ज्योतिबा मंदिरात दर महिन्याला गुरूचरित्र, नवनाथ भक्तिसार आणि केदारविजय पारायणाचे आयोजन करण्यात येते. तसेच दर रविवारी अन्नदान, महाआरती आणि शिवलीला साखळी पारायणाचा उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतो. गेल्या ४२ वर्षांहून अधिक काळ नवनाथ महाराज भालेकर हे मंदिरात मुख्य पुजारी म्हणून अखंड सेवा बजावत आहेत.
चातुर्मास पर्वणीनिमित्त देवघरासमोर ३३ गोपद्म रांगोळ्या काढण्याची परंपरा असून, याला गोपद्म व्रत असे संबोधले जाते. भगवान श्री स्वामी समर्थ, श्री ज्योतिबा महाराज आणि श्री महाविष्णूंची सेवा अधिकाधिक स्वरूपात करण्याचे आवाहन नवनाथ महाराज भालेकर यांनी सर्व सेवेकरी आणि भाविकांना केले. यासोबतच गुरूमंत्र पठण, श्री स्वामी माळ, श्री ज्योतिबा महाराज माळ नामस्मरण, श्रीविष्णू सहस्रनाम स्तोत्र, श्रीपुरुषसूक्त आणि श्रीसूक्त पठण तसेच “ॐ नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जास्तीत जास्त जप चातुर्मास काळात करावा, असेही त्यांनी भाविकांना आवाहन केले.