-डॉ. पंढरीनाथ मान्टे दाम्पत्य व प्रशासनाच्या वतीने तहसीलदार अजित दिवटे दाम्पत्याच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा; ३५ क्विंटल फराळाचे वाटप, हजारो भाविकांची अलोट गर्दी
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : “बोलावा विठ्ठल… पाहावा विठ्ठल… करावा विठ्ठल जीवभाव…” या संतवाणीने दुमदुमलेल्या वातावरणात, टाळ-मृदंगाच्या निनादात, हरिनामाच्या अखंड गजरात आणि वारकऱ्यांच्या भक्तिभावाने प्रतिपंढरपूर म्हणून राज्यभर प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र वैष्णवगडावर यंदाचा आषाढी एकादशी महोत्सव अत्यंत भक्तिमय, भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण वैष्णवगड परिसर भक्तीच्या महासागरात न्हाऊन निघाला. शनिवारी (दि. २५) पहाटेपासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली, तर ७१ पायी दिंड्यांच्या आगमनाने संपूर्ण वैष्णवगड वारकरी संप्रदायाच्या भक्तिरंगात रंगून गेला.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पहाटे तीन वाजता जालना येथील श्री संतकृपा हॉस्पिटलचे प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. पंढरीनाथ मान्टे व त्यांच्या धर्मपत्नी डॉ. सीमाबाई मान्टे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत महापूजा संपन्न झाली. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने तहसीलदार अजित दिवटे यांनी धर्मपत्नीसमवेत श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करून राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. वेदमंत्रांच्या घोषात, अभंगांच्या सुरावटीत आणि हरिनामाच्या अखंड गजरात पार पडलेल्या महापूजेने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. आकर्षक फुलांनी सजलेल्या गाभाऱ्यातील विठ्ठल-रुक्मिणीच्या देखण्या मूर्तीचे दर्शन घेताना अनेक भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. “आज पंढरपूरला जाता आले नाही, पण वैष्णवगडावर साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाले,” अशा भावना अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केल्या. महापूजेच्या वेळी जालना हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रदीप हुसे, समर्थ हॉस्पिटलचे डॉ. शिवानंद जायभाये यांच्यासह विविध नामांकित रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.
यंदाच्या महोत्सवासाठी सिंदखेडराजा, सावखेड तेजन, हनवतखेड, महारखेड, बारलिंगा, साठेगाव, निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा, किनगाव राजा, लिंगा, देवखेड, राहेरी, पळसखेड चक्का, उगला, पिंपळखुट्टा, जळगाव, पिंपळगाव, वाघजाई आदी गावांतून ७१ पायी दिंड्या वैष्णवगडावर दाखल झाल्या. टाळ, मृदंग, वीणा, हरिपाठ आणि अभंगांच्या सुरांनी संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला. वारकरी महिला व पुरुषांनी पारंपरिक फुगड्या खेळत विठ्ठल नामाचा अखंड गजर केला. टाळ-मृदंगाच्या तालावर रंगलेल्या या फुगड्यांनी उपस्थित भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. भक्ती, संस्कृती आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
यावर्षीच्या महोत्सवाला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही वैष्णवगडावर भेट देऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन सर्वच नेत्यांनी भक्तिभावाने दर्शन घेत भाविकांशी संवाद साधला. त्यामुळे धार्मिक श्रद्धा, सामाजिक समरसता आणि लोकसहभागाचे सुंदर चित्र वैष्णवगडावर पाहायला मिळाले. भाविकांच्या सेवेसाठी संस्थेच्या वतीने दिवसभर सुमारे ३५ क्विंटल शेंगदाण्याच्या फराळाचे, चहा तसेच इतर अल्पोपहाराचे मोफत वाटप करण्यात आले. अनेक दानशूर व्यक्तींनी केळीचे वाटप करून सेवाभाव जपला. सुमारे ५०० स्वयंसेवकांनी वाहतूक, दर्शन व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि फराळ वाटपाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत भाविकांची अहोरात्र सेवा केली.
आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्रकुमार साळवे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय शिपे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य पथक दिवसभर सेवेत कार्यरत होते. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रजनी म्हस्के, आरोग्य सेवक शरद वाघमारे, आरोग्य सेविका अनुराधा काकडे, पार्वती सानप, सुरज म्हस्के, स्वाती सिरसाठ, वाहन चालक अंबादास हरकळ यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी हजारो भाविकांची मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार व प्राथमिक उपचार केले.
भाविकांच्या सोयीसाठी सिंदखेडराजा आगाराच्या वतीने वैष्णवगड–सिंदखेडराजा आणि वैष्णवगड–मेहकर मार्गांवर विशेष बससेवा सुरू करण्यात आली. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक दिवसभर कार्यरत होते. मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन वैष्णवगडावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आशिष इंगळे, पोलिस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे तसेच गोपनीय विभागाचे अंमलदार श्रावण डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्ताचे प्रभावी नियोजन करण्यात आले. त्यामुळे हजारो भाविकांच्या उपस्थितीतही संपूर्ण सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
आषाढी एकादशी महोत्सवाने यंदाही भक्ती, सेवा, समता, सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभागाचा प्रेरणादायी संदेश दिला. ७१ पायी दिंड्यांचा उत्स्फूर्त सहभाग, हजारो भाविकांची उपस्थिती, फुगड्यांतून जपलेली वारकरी परंपरा, आरोग्य विभागाची सेवाभावी कामगिरी, स्वयंसेवकांचे योगदान आणि प्रशासनाचे उत्कृष्ट नियोजन यामुळे यंदाचा महोत्सव भाविकांच्या कायम स्मरणात राहील. “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “पांडुरंग हरी”च्या अखंड गजरात हजारो वारकरी भक्ती, समता आणि सेवाभावाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवत समाधानाने परतले.